अनिल वीर सातारा : सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या ११२ व्या स्मृतिदिनानिमित्त माहुली येथील श्रावस्ती बुद्ध विहारात त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन अभिवादन करण्यात आले. पूज्य भंते सुमेध बोधी यांनी उपस्थितांना धम्म देसना दिली. सोबत भंते आनंद व भंते सुमंगल उपस्थित होते.
भंते संघाने रामजी बाबा यांनी पगार वाटपाचे काम केलेल्या मायणी धरणाची पाहणी केली. सन १८९६ च्या सुमारास सातारा पीडब्ल्यूडी अंतर्गत मायणी धरणाचे काम सुरू होते. रामजी सपकाळ गोरेगाव येथे स्टोअर कीपर म्हणून काम करत असताना माहुली (जिल्हा सांगली) व मायणी येथे बाबासाहेबांचे बालपणीचे काही दिवस वास्तव्य होते. बालपणी माहुली यात्रेत झाडाखालचा तमाशा पाहणे,ओढ्यावर खेकडे-मासे पकडणे, मायणीच्या शाळेत जाणे, मोठेपणी वकिलीच्या कामानिमित्त मायणीत मुक्काम करणे, स्वरुप बुवांची कान उघाडणी करणे. अशा अनेक आठवणी स्वतः बाबासाहेबांनी चरित्रकार चांगदेव खैरमुडे यांना सांगितल्या होत्या.
चांगदेव खैरमुडे यांनी १५ खंडातील खंड दोन मध्ये त्याचे वर्णन केले आहे. याशिवाय चं.पू.ईलमे,डॉ. हरिभाऊ पगारे, श्रीरंग रोडगे, भाऊसाहेब वंजारी, स्वतः डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘माझे आत्मचरित्र’ या ग्रंथात सदर माहिती दिली आहे. भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक अविनाश बारसिंग यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी रवींद्र लोंढे,सुनील लोंढे व उत्तम कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. सातारा जिल्हा (पूर्व), सांगली जिल्हा (पश्चिम),खानापूर तालुका, कडेगाव तालुका भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व स्थानिक उपासक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रास्ताविक भूपेंद्र बारसिंग यांनी केले तर दत्तात्रय बारसिंग यांनी आभार मानले.