मुलाला शॉक लागला अन् आई मदतीला धावली; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

0

चाकण : विजेचा शॉक लागून आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना चाकणमधील खराबवाडी येथे घडली. मुलाला विजेचा शॉक लागल्याने आई मदतीला धावली अन् हा अनर्थ घडला. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चाकण जवळील खराबवाडी येथे घराच्या छतावर वीजेचा शॉक लागुन मायलेकाचा जागीच मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली. पल्लवी जाजु असे आईचे नाव आहे, तर समर्थ जाजु (वय, १५ वर्षे ) असे मृत मुलाचे नाव आहे.

घराच्या छतावर आईसोबत १५ वर्षीय मुलगा समर्थ छतावर आला होता. यावेळी बाजुला असणाऱ्या पत्र्यामध्ये विद्युत लाईट प्रवाह उतरला. या पत्र्याच्या संपर्कात आल्याने मुलाला शॉक लागला. मुलाला विजेचा शॉक लागल्याचे पाहताच आई बचावासाठी धावली असताना आईलाही शॉक लागला. यामध्ये १५ वर्षीय मुलासह आईचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जनजागृती व्हावी, यासाठी ही बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे. त्यामुळे वाचकांनी आपल्या सर्व नातेवाईकांना आपल्या स्तरावर सावध करावे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here