राज्यात बर्ड फ्लूच्या H५N१ विषाणूचा प्रादुर्भाव नाही – अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे

0

मुंबई, दि. 25 : बर्ड फ्लू (H5N1) या नवीन रोग प्रादुर्भावाचा धोका वाढला असल्याच्या आशयाचे वृत्त प्रसारित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुठेही बर्ड फ्लू (H5N1) या नवीन रोगाचा प्रादुर्भाव नाही, असे अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

अंडी व कुक्कुटमांस ७० अंश सेंटिग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रिय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत. उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे  पूर्णपणे सुरक्षित असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या बर्ड फ्लूच्या कृती आराखड्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांकडून बर्ड फ्लू सर्वेक्षणाकरिता नमुने प्रामुख्याने परसातील कुक्कुट पक्षी, व्यापारीतत्वावर पाळण्यात येणारे पक्षी, पक्षांचे बाजार, स्थलांतरित पक्षांचे मार्ग, पाणवठ्याच्या जागा जिथे स्थलांतरित पक्षी पाणी पिण्यासाठी एकत्रित येतात, प्राणीसंग्रहालये, जंगल या ठिकाणांहून पक्ष्यांचे नमुने गोळा करून त्याची तपासणी केली जाते. गेल्यावर्षी राज्यामध्ये एकूण २३,३९३ इतके नमुने यादृच्छिक (Randorm) पद्धतीने गोळा करून त्याची तपासणी केलेली आहे, ज्यामध्ये एकाही पक्ष्याचे नमुने H5N1 विषाणूसाठी होकारार्थी आढळून आलेले नाहीत.

बर्ड फ्लू रोगाचा प्रतिबंध विनाविलंब करण्याच्या उद्देशाने प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमान्वये राज्य शासनाला असलेले सर्व अधिकार शासन अधिसूचनेनुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान केले आहेत. कुक्कुट पक्षांमध्ये मरतूक झालेल्या संवेदनशील भागास सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले जाण्याची प्रक्रिया करून आवश्यक त्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजना स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येतात.

राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरित होणाऱ्या पक्षांमध्ये मरतूक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मरतूक झाल्याचे निदर्शनास आल्यास, तत्काळ जवळच्या पशुवैद्यकिय दवाखान्यामध्ये याची माहिती द्यावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १९६२ किंवा १८००२३३०४१८ यावर त्वरित दूरध्वनी करुन त्याची माहिती द्यावी.

प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमाच्या कलम ४(५) अन्वये राज्यातील प्रत्येक पशुपालक अथवा इतर कोणतीही व्यक्ती शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत पशुपालक ज्यांना नमूद कायद्याशी संलग्न असणाऱ्या अनुसूचितील रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तूस्थितीची माहिती जवळच्या ग्राम अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व त्यांनी ही माहिती जवळच्या उपलब्ध पशुवैद्यकाला लेखी स्वरुपात कळविणे बंधनकारक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here