मुंबई : आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य करताना पक्ष आणि चिन्ह पळवल्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राज ठाकरे म्हणाले की ज्याच्या कडे आमदार जास्त पक्ष त्याचा हा कोणता नियम ? असे असेल तर माझ्या पक्षाचा एकच आमदार आहे, तोही निघून गेला असता माझा पक्ष घेऊन. पण, आमच्या विचारातही तसला प्रकार येत नाही, त्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची व राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे, मनसे आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघातून पहिली सभा घेत विधानसभा निवडणुकाच रणशिंग फुंकल .
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही ना त्या एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे, ना त्या उद्धव ठाकरेंची, ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह पळवण्यावरुन दोन्ही पक्षाच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. तुम्हाला आमदार फोडाफोडीचं राजकारण करायचंय करा, शरद पवारांसोबत माझे कितीही मतभेद असतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे शरद पवारांचं अपत्य आहे, ते अजित पवाराचं अपत्य नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी पक्ष फोडाफोडीच्या आणि चिन्ह पळवापळवीच्या राजकारणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली .
पक्ष पळवत आहेत, निशाण्या पळवत आहेत, माणसं पळवली जात आहेत. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणि बिहार करायचाय का तुम्हाला. आत्ताच मी एक व्हिडिओ क्लीप पाहिली मोबाईलवर, मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या व्यासपीठावर भोजपुरी गाण्यावर एक बाई नाचतेय. लोकांचं मनोरंजन करण्यासाठी एक बाई नाचते, ज्या व्यासपीठावर एकनाथ शिंदेंचा फोटो आहे, उमेदवारांचं नाव आहे, हीच का तुमची लाडकी बहीण योजना असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला. तसेच, हे सगळं युपी बिहारमध्ये चालायचं ते आता आपल्याकडे सुरू झालं का, असा सवालही राज ठाकरेंनी विचारला.