मुंबई : ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादामध्ये आज अखेर निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्य बाण हे चिन्ह गोठवलं आहे. या सोबतच शिवसेना हे नावही दोन्ही गटांना आता वापरता येणार नसल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे. हा निर्णय अंतरिम असून येऊ घातलेल्या पोटनिवडणुकी पुरता असणार असेल. या नंतर चिन्ह आणि पक्ष याबाबतचा निर्णय घेण्यासाठी पुन्हा सुनावणी सुरु असेल. तसेच नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
मागील काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च नायालयाने निवडणूक आयोगाला शिंदे आणि ठाकरे गटाच्या पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबत सुनावणी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या . त्याप्रमाणे निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला आपले म्हणणे मांडण्याच्या सूचना दिल्या होत्या . त्याप्रमाणे शिंदे गटाने आपली सर्व कागदपत्रे आयोगाकडे पोहच केले होते. तर शिवसेनेने शिंदे गट पोटनिवडणूक निवडणूक लढवीत नाही तर धनुष्यबाण चिन्ह त्यांना कशासाठी पाहिजे असा सवाल उपस्थित केला होता . ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर आपापले दावे करण्यात आले होते. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगाची मॅरेथॉन बैठक पार पडली आणि या बैठकीत दोन्ही दाव्यांवर विचार करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं.
ठाकरे गटानं आज त्यांच्याकडील महत्त्वाची माहिती निवडणूक आयोगात सादर केली होती. शिवाय अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवारच नाही मग चिन्ह का मागतायत असा सवाल ठाकरे गटानं निवडणूक आयोगासमोर केला होता. शिवाय शिंदेंनी अद्याप उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर दावा केलेला नाही. त्यामुळे चिन्हाबाबतचा दावा पक्षप्रमुखांच्या परवानगीविना होऊ शकत नाही असं ठाकरे गटानं म्हटलं होतं. आमच्याकडे राजधानी दिल्लीमध्ये दहा लाखांपेक्षा अधिक शपथ पत्र तयार आहेत. अडीच लाख पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आणि दहा लाखांपेक्षा अधिक प्राथमिक सदस्यांची शपथपत्रे तयार आहेत. फक्त विहित नमुन्यामध्ये ती सादर करण्यासाठी आम्हाला चार आठवड्यांचा वेळ मिळावा. जर निवडणूक आयोगाला ती आत्ता आहे त्या स्थितीत हवी असतील तर ती पण आम्ही सादर करू, असा दावा उद्धव ठाकरे गटाचा निवडणूक आयोगासमोर केला होता.