उरण दि २१(विठ्ठल ममताबादे ) ; उरण तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या वीजेच्या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी शिवसेना उध्दव ठाकरे गटाने दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी उरण महावितरणच्या कार्यालयावर जोरदार धडक दिली.शिवसेनेच्या धडकेने वठणीवर आलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील वीजेच्या समस्या गणेशोत्सवाच्या सणापुर्वी सुरळीत करण्यात येतील असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहेत.
गणेशोत्सवाचा सण १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने अनेक समस्यांचा सामना करण्याची वेळ मुर्तीकार आणि गणपती कारखानदारांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे श्रींच्या मूर्ती ग्राहकांना वेळेत देता येईल का याची चिंता संबंधितांना भेडसावू लागली आहे.
विजेवर अवलंबून असणारे व्यापारी, दुकानदार वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. मागील १०-१५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे.त्यानंतर कडक उन्हामुळे वाढलेल्या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत.दिवसा-रात्री अचानक वीज गुल होत असल्याने झोपमोड तर होतेच. परंतु आजारी माणसे, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक ,शाळकरी विद्यार्थी व महिलांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.अखंड विज मिळण्याचे स्वप्न ग्रामीण जनतेला पहायलाही मिळत नाही. सणावार पाऊसपाणी या गोष्टीही वीज जाण्यासाठी महत्त्वाच्या राहिलेल्या नाहीत.शहरी, ग्रामीण भागात तर सध्या वीज नाही असा दिवस कॅलेंडर मधून शोधावा लागेल. अशी स्थिती आहे.
यामुळे दिवसा- रात्री वारंवार गुल होणाऱ्या वीजेमुळे नागरिक पार त्रस्त झाले आहेत. वीजेच्या या वाढत्या खेळखंडोब्यामुळे मात्र महावितरण विरोधात परिसरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.याचा जाब विचारण्यासाठी बुधवारी उरण उध्दव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली उरणच्या महावितरणच्या कार्यालयावर जोरदार धडक दिली.यावेळी जिल्हा उपप्रमुख नरेश रहाळकर,तालुका प्रमुख संतोष ठाकूर, रुपेश पाटील,उरण तालुक्यातील पूर्व व जासई विभागातील शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आजी – माजी पुरुष महिला पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.