उरण दि ४(विठ्ठल ममताबादे ) : अरबी समुद्राच्या खाडीचे सानिध्य लाभलेला उरण तालुक्यातील जवळपास पाच हजार लोकवस्तीचा गाव म्हणजे वशेणी गाव.अरबी समुद्राचे करंजा बंदर मार्गे पाताळ गंगा नदी पर्यत पाणी घुसते.याच पाताळ गंगा खाडीत वशेणी दादर हा समुद्राचा खाडी किनारा येतो.बदलत्या हवामान व लोक जीवन शैलीचा या खाडी किना-यावर झालेला परिणाम अभ्यासण्यासाठी नुकताच वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचा समुद्र किना-याचा अभ्यास दौरा संपन्न झाला.
या अभ्यास दौ-याची सुरूवात समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जलपूजेने करण्यात आली.या वेळेस समुद्राला श्रीफळ अर्पण करण्यात आला. तद् नंतर खाडी किनारा,कांदळवने,खाजनाची जागा,समुद्री जीव यांचे निरीक्षण आणि तौलनिक अभ्यास देखील करण्यात आला.या तौलनिक अभ्यासातून गेल्या २०/२५ वर्षापूर्वीच्या समुद्र किनारा आणि आताचा समुद्र किनारा यामध्ये खूपच बदल झालेला दिसून आला. बदलत्या हवामाना नुसार या किना-यावरील भालखुबे, शंकखुबे,आंग्रे,कांदिरवाल,तायतुपय,या सारखे समुद्रीय जीव दुर्मीळ झाल्याचे दिसून आले.तर खाजनाच्या जागेत चिखलावर मौज मजा करणारा निवटी मासा,पालका यांचे प्रमाण देखील खूपच कमी झाले आहे.
बदलत्या लोकजीवन शैलीमुळे कांदळवनाची योग्य देखभाल न झाल्याने खाडी किना-यांची मोठ्या प्रमाणात धूप होताना दिसत आहे.परिणामी बांध फुटून समुद्राचे पाणी शेती क्षेत्रात घुसण्याची संभावना दिसून येते. वशेणी दादर पूल आणि खाडी परीसरात येणारे पर्यटक व मद्यप्रेमी यांच्यामुळे काचेच्या बाटल्या,प्लास्टिक बाटल्या,प्लास्टिक कागद यांचे साम्राज्य किना-यावर दिसून येते.या बाबत जन जागृती होणे गरजेचे आहे.
समुद्राच्या खाड्या पाण्यावर जगणारी खाण्यालायक उपलब्ध असणारी भरपूर प्रमाणात आयोडीन देणारी वनस्पती म्हणजे डावला. पूर्वी डावला ही वनस्पती भाजीत, डाळीत, मच्छीत कींवा पातोळा बनवून खाल्ली जात होती.मात्र अधुनिक जीवन शैलीत या भाजीकडे दुर्लक्ष झाले आहे. तरी तरूणांनी अधून मधून आपला बुध्यांक व आयोडीन मात्रा वाढवण्यासाठी डावला भाजी आहारात वापरावी असे आवाहन या वेळेस मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी केले.या अभ्यास दौ-यात पुरूषोत्तम पाटील,किशोर म्हात्रे, बी.जे.म्हात्रे, हरिश्चंद्र ठाकूर, सतिश पाटील,कैलास पाटील,अनंत पाटील,सुनिल तांडेल ,हरेश्वर पाटील इत्यादी मंडळाचे सदस्य सहभागी होते.