भिलार; सचिन भिलारे : गैरमार्गाने सत्ता मिळवून एकत्र आलेल्या राजकारण्यांकडे कसलेही विकासाचे धोरण नाही. उलट याला संपव, त्याला फोड, अमक्याला तुरुंगात टाक, ईडी लाव, बिडी लाव, निम्मा वेळ सुप्रिम कोर्टात जातोय.
या उद्योगातून त्यांना राज्याकडे बघायला वेळ नाही, अशी जोरदार टोलेबाजी विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
भिलार ता. महाबळेश्वर येथे राष्ट्रवादी जनसंपर्क अभियानांतर्गत आयोजित महाबळेश्वर तालुका पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, आय टी सेलचे अध्यक्ष सारंग पाटील, बाबुराव संकपाळ, जिल्हा युवक अध्यक्ष तेजस शिंदे, बाळासाहेब सोळस्कर, विमल पार्टे, धोंडीराम जंगम, नारायण बिरामणे, दत्ता वाडकर, महादेव दुधाणे, जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपुरे, सरपंच शिवाजी भिलारे, प्रवीण भिलारे, राजेंद्र भिलारे, संजूबाबा गायकवाड, विश्वनाथ सपकाळ, तेजस्विनी भिलारे आदी उपस्थित होते.
आ. रामराजे म्हणाले, सातारा जिल्हा हा स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिला तसाच तो खा. शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या पाठीशी राहिला आहे. देशाच्या राजकारणात कितीही त्सुनामी येवू द्या सातारा हा राष्ट्रवादीचाच अभेद्य बालेकिल्ला राहील. आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, सत्ताधार्यांकडे कसलाही कार्यक्रम नाही. शासनाच्या योजना सांगण्यापेक्षा जिथं जाईल तिथल्या नेत्यांची मापे काढणे व त्यांच्यावर आरोप करणे हाच उद्योग या मंडळींचा चालू आहे.
आ. मकरंद पाटील म्हणाले, महाबळेश्वर तालुका जसा स्व. बाळासाहेब भिलारे यांच्या पाठीशी उभा राहिला त्याच ताकदीने राष्ट्रवादीच्या पाठीशी आहे. आगामी काळात पाचगणी, महाबळेश्वर आणि वाई नगरपालिकांसह पंचायत समिती आणि जिल्हा परिषद राष्ट्रवादीच जिंकणार, असेही ते म्हणाले. आ. शशिकांत शिंदे म्हणाले, सत्तेतील लोक कपटी असून देश एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. या कारस्थानांमधून हुकूमशाहीचा वास येतो आहे. ही हुकूमशाही उलथवण्याची ताकद महाराष्ट्रात आहे. हिंमत असेल तर निवडणूका लावा, आम्ही आमची ताकद दाखवतो. संजूबाबा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र राजपुरे यांनी प्रास्तविक केले. नितीन भिलारे यांनी स्वागत केले. प्रमोद पवार यांनी सूत्रसंचलन केले. संजय जंगम यांनी आभार मानले.