सातारा – शहरातील पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे काम अत्यंत बोगस झाले आहे. त्यामुळे पार्किंगची अडचण झाली आहे. या कामावर केवळ पैसाच खर्च झाला आहे, हे काम करविणाऱ्यांनी मान्य करावे.
या ग्रेड सेपरेटरमधून 56 टक्के वाहने जातात हा सर्व्हे कधीचा, सकाळचा की संध्याकाळचा की पहाटेचा याचे उत्तर द्यावे, असा खोचक प्रश्न आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.
खासदार उदयनराजे भोसले यांनी काल शिवेंद्रसिंहराजेच माझे मुख्य प्रचारक अशी टीका केली होती. त्याला शिवेंद्रसिंहराजेंनी त्यांच्याच शैलीत उत्तर दिले आहे. ते म्हणाले, “”उदयनराजेंच्या कार्यपद्धतीमुळेच त्यांचा प्रचार होतो. त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून आतापर्यंत झालेल्या कामांविषयी बोलावे.
सातारा शहर, तालुका व जिल्ह्यात जी कामे होतात ती यांच्यामुळे होतात. जी होत नाहीत ती आमच्यासारख्या आमदारांमुळे झाली नाहीत, अशी त्यांची भूमिका असते. त्यांच्यावर टीका करण्याची माझी अजिबात इच्छा नाही. पण, त्यांनी काही गोष्टी मान्य कराव्यात. सातारा विकास आघाडीने गेल्या पाच वर्षात पालिकेत केवळ भ्रष्टाचार केला, हे मान्य करावे.”
साताऱ्यातील ग्रेडसेपरेटरचे काम हे बोगसच आहे. त्यांनी किती व कुठलेही सर्व्हे आणून दाखवले तरी त्यांचा टक्क्यांचा आकडा हा पहाटेचा, मध्यरात्रीचा की दुपारचा आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वरून जाणारी वाहनेही या सर्व्हेत धरलीत काय, पण हे काम चुकीचेच झाले असून त्यामुळे पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. ग्रेडसेपरेटरच्या कामावर केवळ पैसा खर्च झालाय हे त्यांनी मान्य करावे, असेही शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले.