सुबद्ध नियोजनाने उरण युवा-महोत्सवात रंगला राज्यस्तरीय काव्य-महोत्सव.

0

उरण दि २४(विठ्ठल ममताबादे ) : उरण- द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन युवा महोत्सव २०२३. आयोजित- राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन- अध्यक्ष  महादेव घरत, संमेलन प्रमुख कविश्री- अरूण द. म्हात्रे आणि कार्यकारिणी यांच्या संगनमताने बोकडवीरा एन्. एम्. एस्. ई. झेड. मैदानात आयोजित करण्यात आले. सुरुवातीस संमेलनाध्यक्ष सर्वेसर्वा  महादेव घरत,  वैशालीताई घरत, मिलिंद खारपाटील, कैलास पिंगळे, म. वा. म्हात्रे, डॉ. स्वरांजली गायकवाड, भ. पो. म्हात्रे, संग्राम तोगरे आदी मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले.

कविश्री अरुण द. म्हात्रे यांनी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांची ओळख करून दिली. प्रास्ताविक आणि मनोगतात अध्यक्ष महादेव घरत यांनी कवी संमेलन प्रमुख- कविश्री अरूण द. म्हात्रे यांच्यासह संयोजक/निवेदक-  संजय होळकर,भ. पो. म्हात्रे, चेतन पाटील, सुचित्रा कुंचामवार,मिनल माळी आणि प्रज्ञा म्हात्रे या सर्वांच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले. युवा महोत्सवाची एकंदरीत आखणी आणि विविध कार्यक्रमाची माहिती दिली. कवी/गायक-  अरुण द. म्हात्रे यांच्या “बार बार दिन ये आये…” या सुश्राव्य गीत गायनाने वातावरण संगीतमय झाले. त्यानंतर कवी संमेलनाला सुरुवात झाली.सदर राज्यस्तरीय कवी संमेलनाला राज्याच्या विविध भागांतून अनेक मान्यवर कवी/कवयित्रींनी उत्साहाने सहभाग नोंदविला. त्यात ७५-८० वर्षा चे वृद्ध महिला/पुरुष सुद्धा होते. एकूण ५० सारस्वतांनी आपल्या विविध विषयांच्या आशय संपन्न बहारदार रचना सादर केल्या. त्यामुळे हे संमेलन “काव्य-सुमनांनी” फुलले. प्रत्येक कवी/कवयत्रीस सादरीकरणानंतर लगेच मान्यवरांच्या शुभ हस्ते गुलाब पुष्प, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि रोख रुपये २००/- देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे आणि मान्यवर यांनी आपल्या मनोगतात- संमेलनाला उपस्थित राहिल्यामुळे कवी-कवयित्रींच्या सुंदर काव्यरचना ऐकून विशेष आनंद मिळाल्याचे सांगून सुबद्ध नियोजनाचे कौतुक केले. शेवटी  संजय होळकर यांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे तसेच उपस्थित सर्व  सारस्वतांचे सुंदर शब्दांत आभार मानले. संमेलन प्रमुख अरुण द. म्हात्रे यांच्या समवेत मीनल माळी आणि सर्वांनी सुस्वरात पसायदान सादर केले. अशाप्रकारे सुनियोजनाने, आणि आनंददायी तसेच खेळीमेळीच्या वातावरणात सदर राज्यस्तरीय कवी संमेलनाची  सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here