कोपरगाव : दि. १५ ऑक्टोंबर २०२२
कोपरगाव तालुक्याच्या माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांना सल्ला देण्याइतपत वर्षा गंगुले यांची उंची आणि लायकी नाही. लोकशाहीने सर्वांना बोलण्याचा अधिकार दिला म्हणून कोणीही काहीही बोलावे असे नाही. मागील पाच वर्षांत स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अनेक विकासकामे केली, ती जनतेसमोर आहेत. आपण मागील पाच वर्षे नगरसेविका असूनही आपल्याला साधा आपल्या घरासमोरील रस्ता करता आला नाही. आपल्या घराजवळील गांधीनगरमधील सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न आपल्याला सोडविता आला नाही. त्यामुळे आपण नगर-मनमाड महामार्ग, तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न यावर बोलण्याच्या फंदात पडू नये, असा सल्ला भाजपच्या माजी नगरसेविका अलका लकारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका वर्षा सुनील गंगुले यांना दिला आहे.
अहमदनगर-मनमाड महामार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी तसेच या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम लवकर सुरू करावे म्हणून स्नेहलता कोल्हे यांनी भरपावसात अहमदनगर-मनमाड महामार्गावर आंदोलन केले. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. अहमदनगर-मनमाड महामार्गाची झालेली दयनीय अवस्था आणि या महामार्गावरून जाताना नागरिकांचे होत असलेले हाल पाहून स्नेहलता कोल्हे यांनी तसेच भाजप कार्यकर्त्यांनी मुसळधार पाऊस सुरू असतानाही तीन तास आंदोलन केले आणि जनतेच्या ज्वलंत प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. या महामार्गावर शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साईबाबा देवस्थान, संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम, कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रम, आत्मा मालिक ध्यानपीठ आणि इतर अनेक धार्मिक व ऐतिहासिक स्थळे आहेत.
नगर-मनमाड महामार्गावरील खड्डे बुजविण्याकडे तीन वर्षे दुर्लक्ष का केले?
कोपरगाव शहर आणि तालुक्यातील महिला-पुरुषांना शिर्डी, राहुरी, अहमदनगरकडे जाण्यासाठी हाच सोयीचा रस्ता आहे. या महामार्गावरून दररोज वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या महामार्गावर कोपरगाव-सावळी विहीर ते शिर्डीपर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे प्रवास करणे मुश्किल झाले आहे. या रस्त्यावर गुडघ्याइतके मोठमोठे खड्डे पडल्यामुळे दररोज अपघात होऊन त्यात निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत. मागील तीन वर्षांत नगर-मनमाड महामार्गाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. त्यास कोण जबाबदार आहे हे जनतेला चांगल्या प्रकारे माहीत आहे. या रस्त्याची दुर्दशा झाल्याबद्दल जनतेची सतत ओरड होत असतानाही आपल्या पक्षाचे नेते आणि कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी गेली तीन वर्षे या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी किंवा रस्ता दुरुस्तीसाठी काहीच केले नाही. आता मात्र ते या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाल्याचे सांगून फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपण स्वत: न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याची आणि स्टंटबाजी करण्याची त्यांची जुनीच सवय आहे, अशी टीकाही अलकाताई लकारे यांनी केली आहे.
गाजावाजा करण्याची आम्हाला नव्हे तर तुम्हालाच सवय!
लकारे म्हणाल्या की, माजी आमदार कोल्हे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अनेक विकासकामे केली, जनतेच्या अडीअडचणी सोडविल्या; परंतु त्याचा कधीही गाजावाजा केला नाही. याउलट आ. आशुतोष काळे हे मात्र सतत बॅनर व फ्लेक्स लावून आपला उदोउदो करून घेत असतात. गेल्या तीन वर्षांपासून आ. काळे हे ‘मी हे काम केले, हे काम करणार आहे, हे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे, हा प्रश्न लवकरच सुटेल’ असे सातत्याने सांगत आहेत. त्यांचे हे पालुपद ऐकून शहर आणि तालुक्यातील जनता जाम वैतागली आहे. सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमधून जनतेची दिशाभूल करून स्वत:ची प्रसिद्धी करवून घेण्यापलीकडे आ. काळे यांचे काहीच कर्तृत्व जनतेला दिसत नाही.
आपण न केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेण्याचा आ. काळे यांचा प्रयत्न
कोल्हे यांनी आमदारकीच्या काळात शासनाकडे पाठपुरावा करून कोपरगाव शहरात नवीन सुसज्ज बसस्थानक, पंचायत समिती, नगर परिषद कार्यालय, वाचनालय, अग्निशमन दल इमारत, गोकुळनगरीतील पूल, बाजार तळ भागात भाजी विक्रेत्यांसाठी ओटे आदी अनेक कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करवून आणला. मात्र, यामध्ये स्वत:चे कसलेही योगदान नसतानाही आ. आशुतोष काळे यांनी स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नातून झालेल्या विविध विकासकामांचा स्वत:च्या हस्ते लोकार्पण सोहळा उरकून फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला हे सर्वश्रुत आहे. आताही ते आपण न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा खटाटोप करत आहेत, असा आरोप अलकाताई लकारे यांनी केला आहे.