शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटेंचं अपघाती निधन

0
शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटेंचं अपघाती निधन झालं आहे.

विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर ही घटना घडली. आज (14 ऑगस्ट) पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.

या अपघातात मेटेंना गंभीर दुखापत झाली. त्यांच्या डोक्याला आणि पायाला मार लागला. त्यांच्यावर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते.

एमजीएमचे मेडिकल संचालक डॉ. कुलदीप संकोत्रा यांनी सांगितलं की, “विनायक मेटे यांच्या डोक्यावर गंभीर जखम झाली होती. अपघातस्थळीच त्यांचा मृत्यू झाल्याचं दिसून येत आहे.”

“सकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी त्यांच्या गाडीला अपघात झाला. सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा लगेच त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांचा ईसीजी काढण्यात आला, पण तो पूर्णपणे ब्लँक आला. त्यानंतर आम्ही त्यांना मृत घोषित केलं.

“मी स्वत: त्यांना पाहिलं. त्यांच्या डोक्यावर जबर मार लागला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल.”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं, “मराठवाड्यात एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले आणि कष्टानं स्वत:चं नेतृत्व उभं केलं, असे नेते म्हणून विनायक मेटेंची महाराष्ट्राला ओळख आहे. मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न अशा सामाजिक प्रश्नांची त्यांना जाणीव होती.”
भाजप नेते विनोद तावडे यांनी विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी म्हटलं की, “विनायक मेटेंचं निधन ही धक्कादायक बातमी आहे. त्यांच्यासारखा नेता जाणं हे धक्कादायक आहे. मराठी शेतकरी, शेतमजूर यांना न्याय देणारे मेटे नेते होते. त्यांचं अशावेळी जाणं खूप धक्कादायक आहे. आम्ही एकत्र काम केलं. समाजाला न्याय मिळवून देण्यात ते अतिशय अग्रेसर होते. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”
विनायक मेटेंचं असं जाणं अनपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

“मराठा आरक्षणाच्या विषयासाठी सातत्यानं झगडणारा माणूस असा अचानक गेला, एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे,” या शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

“समाजासाठी परखड भूमिका मांडणारे एकमेव आमदार होते. मराठा आरक्षणासाठी त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. समाजाला न्याय मिळावा, ही मेटे यांना खरी श्रद्धांजली असेल,” असं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here