छ. संभाजी नगर : हिंदूंचा नेता पंतप्रधान झाल्यानंतरही हिंदूंना आक्रोश करावा लागतोय या पेक्षा आणखी दुर्दैव काय असू शकते अशा भाषेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली .छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या महाविकास आघाडीची संयुक्त सभा झाली. या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाषण झालं.
ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर चौफेर टीका केली. ते पुढे म्हणाले की, आमचं हिंदुत्त्व शेंडी-जाणव्याचं हिंदुत्त्व नाहीय, आमचं हिंदुत्त्व हे राष्ट्रीयत्त्व आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. “भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा म्हणतात की, या देशात एकही विरोधी पक्ष ठेवणार नाही. मात्र, मी तुम्हाला सांगतो, भाजपला नामशेष केल्याशिवाय मी राहणार नाही,” असं ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मविआ सरकार तुम्हाला पसंत होत का? तिघे एकत्र आलो, पण सत्ता गेल्यावरही आम्ही घट्टपणे एकत्रच आहोत.”
यावेळी उद्धव ठाकरेंनी अमित शाहांवरही नाव घेऊन निशाणा साधला. ते म्हणाले की, “अमित शाहांनी आरोप केला की, शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटतेय, मग मी विचारतो अमित शहांना विचारतो की, मग भाजप मिंधेंचे काय चाटतंय?”
“चांगली चाललेली सरकारे पाडायची. मग तेव्हा तुम्ही नितिश कुमारांचे काय चाटत होतात? मोदी म्हणतात त्यांची प्रतिमा खराब करतायत. मग आमची प्रतिमा नाही का? तुमचा अपमान म्हणजे ओबीसींचा अपमान? विरोधी पक्षातील लोकांना त्रास दिला जातोय. तुम्ही मेघालयात संगमावर भष्टाचाराचे आरोप केले होते आता तुम्ही संगमांचे काय चाटताय?
“भ्रष्ट दिसला की घे पक्षात सगळे भ्रष्ट तुमच्या पक्षात मग हा भारतीयांचा अपमान आहे. भ्रष्टाचारी पक्ष म्हणून नाव ठेवा. आता भाजपच्या व्यासपीठावर सगळे संधी साधू. तुमचे हिंदुत्व आम्ही मानायला तयार नाही. लोकशाही संपवायची इतरांना ठेवायचे, तुरूंगात टाकायचे.”
‘तुम्ही मोदींना आणा, मी माझ्या वडिलांचं नाव घेऊन येतो’
भाजपवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “संकट येते तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी मदत केली. भाजपची पालखी व्हायला शिवसेनेचा जन्म नाही तो भूमीपुत्रांसाठी. आता आहे कोण भाजप सोबत?
“आपलं नाव, चिन्ह आणि वडील चोरायचा प्रयत्न केला. यांचे वडील म्हणत असतील काय दिवटं कार्ट आहे. यांना बाप पण दुसरे लागतात.
“या मोदींना घेऊन या मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन येतो. मला जनतेचे आशीर्वाद ते तुम्ही चोरु शकत नाही. इतरांचे विचार तुमचे वाचू का? म्हणून विचारता पण जनता मतदानाला उतरेल तेव्हा तुम्ही वाचणार नाही.”
भगवा तुमच्या हातात शोभत नाही – उद्धव ठाकरे
यावेळी राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याच्या मुद्द्यालाही उद्धव ठाकरेंनी हात घातला. तसंच, तेजस्वी यादव यांची चौकशी आणि सुप्रिया सुळे-सुषमा अंधारे यांच्यावर सत्ताधारी आमदारांनी केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “हिंडनबर्गच्या अहवालावरून राहुल गांधींना शिक्षा करण्यात आली. तुम्हाला का प्रश्न विचारायचे नाही? अनिल देशमुखांच्या सहा वर्षांच्या नातीची चौकशी केली गेली. हे कसले हिंदुत्व? कशाला महाराजांचे नाव घेता? एक गद्दार सुप्रियाताईंना बोलतो, एक गद्दार सुषमाताईंना बोलतो. हे असले गद्दार. मत पटत नसेल तर मतावर बोला, पण महिलांना शिव्या देणे हे मी कधी सहन केले नसते. भगवा तुमच्या हातात शोभत नाही. नुसती सत्ता हवी.”