अजित पवार आमचेच नेते : शरद पवार

0

पक्षात वेगळी भूमिका मांडणे म्हणजे फूट नव्हे

बारामती : अजित पवार हे आमचेच नेते आहेत. पक्षात काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, म्हणजे पक्षात फूट पडली असं म्हणण्याचं कारण नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची आज कोल्हापुरात सभा आहे. या सभेसाठी रवाना होण्याआधी बारामती येथे पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी केलेली काही वक्तव्ये बुचकळ्यात पाडणारी होती.

विशेष म्हणजे, शरद पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनीही काल (24 ऑगस्ट) अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं. पाठोपाठ शरद पवारांनीही तशाच प्रकारचं वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना ऊत आला आहे.

एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असं म्हटलं जातं. पण सुप्रिया सुळे यांनी फूट वगैरे काहीही नसल्याचं म्हटलं. तसंच अजित पवार हे आमचेच नेते आहेत, असंही त्या म्हणाल्या होत्या. यामुळे संभ्रम निर्माण होत आहे, याबाबत आपलं मत काय, असा प्रश्न शरद पवारांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला.

याचं उत्तर देताना शरद पवार म्हणाले, “हो ते (अजित पवार) आमचेच नेते आहेत. त्यात काही वाद नाही. पक्षात फूट कधी असते? जर देशपातळीवर एखादा गट वेगळा झाला तर त्याला फूट म्हटलं जातं. पण अशी स्थिती आमच्या पक्षात नाही.”

“काही लोकांनी पक्ष सोडला किंवा काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लोकशाहीत तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी तो निर्णय घेतला म्हणून फूट म्हणण्याचं काहीही कारण नाही, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार हे आमच्यासोबत येतील, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे, त्यावर आपली प्रतिक्रिया काय, असा प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार त्यावर रागावले. यावेळी “काहीही फालतू प्रश्न विचारता का,” असा प्रतिप्रश्न पवारांनीच पत्रकाराला केला.

बीडमध्ये शरद पवारांनी सभा घेतल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवार गटाकडूनही सभा घेण्यात येणार आहे. त्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, “प्रत्येकाला सभा घ्यायचा अधिकार आहे. त्याबाबत चिंता वाटण्याचं काहीही कारण नाही. सगळे आपली भूमिका मांडण्यासाठी पुढे येत आहेत. त्यापैकी कुणाची भूमिका योग्य हे लोकांना कळेल. त्यामुळे कुणीही आपली भूमिका मांडण्यासाठी पुढे येत असेल, तर मी त्यांचं स्वागत करतो.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here