कोपरगांव (वार्ताहर) दि. १९ सप्टेंबर २०२२
तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असल्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकासह अन्य साधन संपत्तीचे प्रचंड नुकसान झाले असून त्याची पाहणी करून पंचनामे करावेत व तातडीने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कोपरगाव तालुका भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी केली.
तहसीलदार विजय बोरुडे यांना तालुक्यातील पोहेगाव परिसरातील अंजनापुर, रांजणगाव देशमुख, जवळके, काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगांव, वेस सोयगांव, धोंडेवाडी, बहादरपुर, बहादराबाद, शहापुर परिसरातील शेतकऱ्यांनी शिष्टमंडळसह सोमवारी भेट घेऊन निवेदन दिले त्याप्रसंगी ते बोलत होते. पाऊस सारखा कोसळत असल्यामुळे सोयाबीन मका कपाशी आदी पिकांचे नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांच्या हातात कुठल्याही प्रकारचे खरीप उत्पादन मिळणार नाही अशी सध्याची परिस्थिती आहे.
विक्रम पाचोरे पुढे म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून पर्जन्यमान बरे आहे. चालू वर्षी सुरुवातीला पाऊस कमी प्रमाणांत होता. पण ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत त्याने सर्व सिमा ओलांडल्या आणि शेतकऱ्यांवर जा रे जा पावसा असे म्हणण्याची वेळ आली आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन खरीप पिकाची लागवड केली त्यातून अडचणींचे निवारण होईल अशी शेतकऱ्यांना आशा असतांना वरूणराजाने सतत पावसाची बरसात लावल्याने शेती पिकात प्रचंड पाणी साठले आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने जादा पाण्यांमुळे पीके सडून गेली आहे. भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे व युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे मागणी करून पीक नुकसानीचे पंचनामे करावे म्हणून मागणी केली आहे. तरी शेतकऱ्यांचे पीक नुकसानीची पाहणी करून तात्काळ दिलासा द्यावा व कोपरगांव महसूल मंडळातील सर्व मंडल अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत असे विक्रम पाचोरे, कैलास रहाणे व सर्व शेतकरी बांधवांनी म्हटले आहे.
फोटो ओळी कोपरगाव
तहसीलदार विजय बोरुडे यांना तालुक्यातील पोहेगाव परिसरातील अंजनापुर, रांजणगाव देशमुख, जवळके, काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगांव, वेस सोयगांव, धोंडेवाडी, बहादरपुर, बहादराबाद, शहापुर परिसरातील शेतकऱ्यांनी शिष्टमंडळसह सोमवारी भेट घेऊन अतिवृष्टीमुळे पिक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा म्हणून मागणीचे निवेदन दिले.