शाहूवाडी : अयोध्येहून परतणाऱ्या मोटारीला झालेल्या भीषण अपघातात चौघे ठार झाले. त्यात बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील ज्येष्ठ छायाचित्रकार दिलदार मकबूल तांबोळी (वय ६२) यांच्यासह हमजीखान अत्तार (तासगाव, जि.सांगली), संगीता कदम (सांगली) आणि भगवान पोवार (सांगोला) यांचा समावेश आहे. अनिल नामदेव पाटील (२६, रा. पिशवी, ता. शाहूवाडी) गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव मोटारीची कंटेनरला जोरादार धडक झाली. इंदूरजवळील राजगद (मध्य प्रदेश) येथे सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार भगवान पोवार यांच्या मोटारीतून तांबोळी, अनिल पाटील, अत्तार, संगीता कदम लखनौला एका सौंदर्यप्रसाधन कंपनीने बोलविलेल्या बैठकीसाठी गेले होते. तेथून सर्वजण अयोध्येला गेले होते. तेथून परतत असताना इंदूरजवळ राजगद येथे चालक भगवान पोवार यांचा भरधाव मोटारीवरील ताबा सुटला. त्यामुळे मोटार रस्त्याकडील उभी असलेल्या कंटेनरवर पाठीमागून आदळली. या दुर्घटनेत मोटारीचा चक्काचूर झाला. अपघातात तिघे जागीच ठार झाले तर दिलदार तांबोळी यांचा उपचारादरम्यान आज पहाटे मृत्यू झाला.
अपघातातील अनिल पाटील यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना मध्य प्रदेशमध्येच एका रुग्णालयात दाखल केले आहे. बांबवडे येथील तांबोळी यांचा अनेक वर्षे छायाचित्रणाचा व्यवसाय आहे. ते तालुक्यातील प्रसिद्ध छायाचित्रकार होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे तर अत्तार यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. तांबोळी हे अत्तार यांचे मेव्हणे आहेत. गंभीर जखमी अनिल पाटील यांचा बांबवडे येथे छोटा व्यवसाय आहे.
अपघाताची माहिती मिळताच तांबोळी यांचे भाऊ आणि अन्य नातेवाईक तातडीने घटनास्थळी पोहोचले. तेथून ते पार्थिव घेऊन निघाले आहेत. त्यांचे वाहन उद्या (बुधवारी) सकाळी तासगाव येथे नऊच्या दरम्यान येईल. तेथे अत्तार यांच्या पार्थिवावर दफनविधी होईल. त्यानंतर तांबोळी यांचे पार्थिव दुपारच्या दरम्यान बांबवडे येथे आणण्यात येणार आहे.