संगमनेर : भर दिवसा आजी,आजोबांना मारहाण करत आमच्या नादाला लागला तर संपवुन टाकू अशी धमकी देत त्यांच्या अल्पवयीन नातीला पळवून नेणाऱ्या आरोपींना संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या विशेष पथकाने श्रीगोंदा येथे ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. आरोपीमध्ये एका महिलेसह सहा जणांचा समावेश असून त्यांच्याकडून मुलीला पळवून नेण्यासाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी ब्रेझा कार आणि एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
याबाबत तालुक्यातील पठार भागातील पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यात तिने म्हटले होते की आपली अल्पवयीन मुलगी पठार भागातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून अमोल बापू खेमनर हा अल्पवयीन मुलीस घटनेच्या पंधरा दिवसांपूर्वी घेऊन गेला होता व पंधरा दिवसानंतर त्याने तिला घरी सोडले होते. त्यावेळी अमोल खेमनर यास तंबी दिली होती. मात्र त्यानंतर शुक्रवार दि. २३ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेचे सुमारास अमोल बापु खेमनर , सिंधुबाई बापु खेमनर, बापु रंभा खेमनर, संदेश चिलाप्पा खेमनर, मंगेश धोडीभाऊ शेंडगे, पोपट शेरमाळे असे सहा जण अमोल खेमनर याच्याकडील पांढऱ्या रंगाच्या ब्रेझा गाडी मधुन अल्पवयीन मुलीच्या घऱी आले व त्यांनी अल्पवयीन मुलीचे आजी, आजोबा यांना मारहाण करून आमच्या नादाला लागला तर संपवुन टाकू अशी धमकी देत अल्पवयीन मुलीस धाक दाखवून पळवून घेऊन गेले.याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. २९९/२०२२भा.द.वि.कलम१२०(ब),३६३,३६६,१४१,१४३,१४७, ३२३,५०४,५०६ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे पथक, घारगाव पोलीस ठाण्याचे पथक, आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकासह तीन पथके आरोपींचा शोध घेत होते.सदर गुन्ह्यातील आरोपी हे पिडीत अल्पवयीन मुलीस श्रीगोंदा, दौंड, पाटस, बारामती, भिगवण येथे घेवुन असले बाबत तांत्रीक पुराव्या वरुन निष्पण झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी त्यांचे तपास पथक सदर ठिकाणी पाठवले. या तपास पथकाने तात्काळ जात दीड दिवसा मध्ये पीडित अल्पवयीन मुलगी व आरोपी यांना पाटलाग करुन ताब्यात घेतले. त्यांचेकडुन एक मारुती सुझुकी ब्रेझा कार नं. एम.एच.१४ एफ.एस. ६५८९ व एक होन्डा स्प्लेंडर हस्तगत केली असुन आरोपींना पुढील कारवाई कामी घारगांव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या तपास पथकात पो.ना आण्णासाहेब दातीर, पो.कॉ अमृत आढाव, पो.कॉ सुभाष बोडखे, पो.कॉ प्रमोद गाडेकर, पो.ना फुरकान शेख, पो.कॉ प्रमोद जाधव, पो.कॉ आकाश बहिरट, पो.ना संतोष खैरे, पो.ना गणेश लोंढे, पो.कॉ हरिचंद्र बांडे, पो.कॉ प्रमोद चव्हाण, पो.कॉ नामदेव बिरे यांचा समावेश होता.