कोपरगाव : दि.२९ सप्टेंबर २०२२
कोपरगाव नगरपालिकेने मालमत्ता कराच्या चुकीच्या सर्वेवरून आकारलेल्या अवास्तव घरपट्टीवरून शहरात भाजपा सेना रिपाई (आठवले गट) यांच्या वतीने सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद बुधवारी पालिका प्रशासनातही उमटले.मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी तडकाफडकी पाच लिपिकांना निलंबित केले. हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी या कारवाईचा पराग संधान यांनी निषेध केला.आमच्या अवास्तव करवाढीच्या धडाक्याने विरोधकासह प्रशासनाला धडकी भरली असल्याची टीकाही पराग संधान यांनी केली.
भाजपा सेना रिपाई (आठवले गट)यांचे पराग संधान यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखळी उपोषण सुरू आहे .
मालमत्ताधारकांवर लादलेली अन्यायकारक घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारणी करावी, मालमत्तांचे चुकीचे सर्वेक्षण करणाऱ्या आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीला नगर परिषदेने दिलेले ७५ लाख रुपये परत घ्यावेत, या कंपनीविरुद्ध नगर परिषदेने गुन्हा दाखल करावा, या कंपनीला दिलेले कंत्राट रद्द करून काळ्या यादीत टाकावे आदी प्रमुख मागण्या संधान यांनी केल्या आहेत.
या आंदोलनाला शहरातील विविध भागातील नागरिकासह महिलांचा वाढता प्रतिसाद पाहून विरोधकांना सुद्धा धडकी भरली आहे. त्यामुळे ते रोज वेगवेगळ्या लोकांच्या नावाने आमदार आशुतोष काळे यांनी मान्य केलेली ४०% टक्के वाढ कशी बरोबर आहे हे दाखविण्यासाठी प्रसिद्धी पत्रके काढीत आहेत. विशेष म्हणजे ज्या लोकांच्या व व्यापाऱ्यांच्या नावाने ही पत्रके काढली गेलीत त्या व्यापारी नागरीक यांनी आंदोलनाच्या स्टेजवर येऊन आपला पाठिंबा साखळी उपोषणाला दर्शविला आहे त्यामुळे काळे गटाकडून श्रेयासाठी चाललेली केविलवाणी धडपड पाहून त्यांची कीव येते असं टोला भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले यांनी लगावला.
मुळात हा विषय राजकीय नाहीच इथे लोकांच्यावर आर्थिक बोजा पडणार आहे तेंव्हा याच्यात श्रेयाचा प्रश्न येतोच कुठे ? प्रश्न लोकांच्या हिताचा व जिव्हाळ्याचा असल्याने लोक आमच्याबरोबर येत आहेत तात्कालीन नगरसेवकांनी 0 . 25 टक्के करवाढ करण्यास ठरावाद्वारे मंजुरी दिली होती. असे असताना आमदार आशुतोष काळे यांनी खाजगी बैठक घेतली. त्या बैठकीत नगरपालिकेने करवाढ करताना ती भाडे मूल्यावर कि भांडवली मूल्यावर केली आहे याची चौकशी केली नाही ? वाढ किती होणार याची माहिती घेतली नाही ? केवळ श्रेय लाटण्यासाठी तडकाफडकी मुख्याधिकारी यांनी कायद्याने ४०% पर्यंत वाढ करता येते असे सांगितले. आणि यांनी पालिका प्रशासनाच्या हो’ला हो करत ४० % करवाढ कुठलाही विचार न करता मान्य केली. इथेच न थांबता लढाई जिंकल्याच्या थाटात फ्लेक्स लावून याचा आनंदोत्सव साजरा केला. कोरोना संकटामुळे आर्थिक संकटात असलेल्या शहरातील नागरिकांवर अवास्तव कराचा बोजा लादला गेला याचा त्यांना विसर पडला होता. आमच्या साखळी उपोषणाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून बाजी अंगावर आल्यानंतर आता केलेले पाप झाकण्यासाठी रोज गावातील वेगवेगळ्या प्रतिष्ठित लोकांच्या नावाने आपली भूमिका कशी रास्त आहे याचे खुलासे केले जात आहे अशाने केलेले पाप लपवता येणार नाही असेही भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी शेवटी म्हटले आहे.