सांगली : सांगलीकरांना शिवीमुक्त करण्याचा चंग ‘मस्जिद-ए-नमराह’ या संघटनेने बांधला आहे. त्यासाठी त्यांनी ‘शिवीमुक्त कट्टा’ उभारला आहे. सध्या या ‘शिवीमुक्त कट्टय़ा’ची आणि त्यावरील फलकाची चर्चा सांगली शहरात सध्या चांगलीच रंगली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात शिवीशिवाय काहीजण पाणीदेखील पीत नाहीत. ‘आमच्याकडे शिवी म्हणजे प्रेम’ अशी फुशारकी मारणारे गल्लीबोळात अनेकजण भेटतात. आपल्यातली मैत्री किती घट्ट आहे, हे दाखविण्यासाठी काहीजण बेछूट शिव्या हासडतात. त्यात आईवरून शिव्यांची यादी तर मोठीच! या सर्व प्रकाराने अस्वस्थ होऊन तरुणांनी शिवी सोडली पाहिजे, यासाठी ‘मस्जिद-ए-नमराह’ या संघटनेने ‘नेकी के राह पर एक कदम’ असे म्हणत ‘शिवीमुक्त कट्टा’ असा संकल्प केला आणि त्यासाठी सांगलीतील एका चौकात ‘शिवीमुक्त कट्टा’ उभारला आणि फलकावर आईचे माहात्म्य सांगणाऱया ओळी लिहिल्या.
‘प्रचंड वेदना सहन करून आई बाळाला जन्म देते, खूप कष्टाने त्याला सांभाळते, मोठे करते, स्वतः झिजते आणि बाळाला प्रेम देते. त्यामुळे तिच्याबद्दल आदर हवाच. त्यामुळे तिच्यावरून आपण शिवी का द्यावी?’ असे म्हणत आई आणि बहिणीवरून शिवी न देण्याचा संकल्प करण्याचा संदेश या फलकावर देण्यात आला आहे.
सध्या या फलकाची सांगलीत सोशल मीडियासह सर्वत्र जोरदार चर्चा असून, त्याचे कौतुकही होत आहे. सांगली शहरातील एका चौकात हा फलक आणि कट्टा उभारला आहे. येणारे-जाणारे अनेकजण उभे राहून या कट्टय़ावरचा मजकूर वाचतात आणि अंतर्मुख होऊन यापुढे शिवी न देण्याचा मनोमन संकल्प करून
पुढे जातात. या अभिनव कट्टय़ाची चर्चा मात्र शहरात चांगलीच रंगली आहे.