सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बिळूर येथील लिंगनूर तलवात रविवारी (दि.9) मध्यरात्री आईसह तीन मुलींचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेमुळे जत तालुक्यात
खळबळ उडाली असून पतीनेच पत्नी आणि तीन मुलींना तलावात ढकलून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना
दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तलावाच्या पाण्यातून चार मृतदेह बाहेर काढले. ग्रामस्थांनी पतीला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सुनिता तुकाराम माळी (वय 30), ऐश्वर्या तुकाराम माळी (8 वर्षे), अश्विनी तुकाराम माळी (9 वर्षे) व अमृता तुकाराम माळी (12 वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. पती तुकाराम माळी याला दारुचे व्यसन असल्याने त्यानेच हे कृत्य केल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. पतीनेच दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची चर्चा गावात आहे.
बिळूर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर सुतार वस्तीजवळ लिंगनूर तलावआहे. या तलावाजवळ माळी वस्ती आहे. या वस्तीच्या आसपास कोणतीच वस्ती नाही. याठिकाणी संशयित तुकाराम माळी हा आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याला दारु पिण्याचे व्यसन आसून तो दारुच्या आहारी गेला आहे. त्याच्या दारु पिण्यावरुन पत्नी सुनिता आणि त्याच्यामध्ये सतत वाद होत. होते.
तुकाराम माळी हा काल दिवसभर दारुच्या नशेत होता. दारुच्या नेशेत त्याने वस्तीवरील काही जणांसोबत वाद घातले होते. रात्री दारुच्या नशेत त्याने पत्नी आणि तीन मुलींना मारहाण करुन तलावात ढकलून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रात्री माळी यांच्या घरात कोणीच नसल्याने ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. ग्रामस्थांना सुनीता आणि तिच्या तीन मुलींचे मृतदेह तलावाच्या पाण्यात मध्यरात्री दीडच्या सुमारास आढळून आले. तर पती तुकाराम हा. कोठेच दिसला नाही.
ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी चार मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पंचनामा केला.
आज सकाळी मृतदेह जत येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले.
यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. पोलीस संशयित आरोपी तुकाराम माळी याच्याकडे सखोल चौकशी करत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.