संगमनेर : खास दीपावलीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेन्द्र यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य माणसाची दिवाळी गोड व्हावी यासाठी आनंदाचा शिधा किराणा किटचे तालुक्यातील रहिमपूर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकाना मार्फत लाभार्थी सर्व ४२८ कार्ड धारकांना वाटप करण्यात आले.
केवळ शंभर रुपयात एक किलो रवा, एक किलो चणा डाळ, एक किलो साखर, एक लिटर गोडेतेल पिशवी अशा वस्तू या आनंदाचा शिधा या किटमध्ये आहेत. या किटचे वितरण रहिमपूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन बाजीराव वाळुंज यांचे हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना देऊन करण्यात आले. यावेळी सेक्रेटरी विलास कोल्हे, सहसेक्रेटरी बाळासाहेब गीते, सेल्समन बाळासाहेब भवर, मदतनीस भाऊराव दोडके, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष बाजीराव एकनाथ शिंदे, सोमनाथ शिंदे, बाळासाहेब शिंदे, ज्ञानदेव जोर्वेकर, रामनाथ श्रीरंग शिंदे आदींसह लाभार्थी यावेळी उपस्थित होते.ऐन दिवाळीत शासनाकडून १०० रुपयात रवा, चणा डाळ, साखर आणि गोडेतेल पिशवी या चार वस्तू मिळाल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.