आयटीआय इमारतीसाठी २.६६ कोटी निधीस मान्यता – आ.आशुतोष काळे

0

 कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव येथील आयटीआय इमारत व कार्यशाळेसाठी ७.६६ कोटी निधीस महाविकास आघाडी सरकारने सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन २.६६ कोटी निधी जिल्हा नियोजन समितीने उपलब्ध करून द्यावे असे शासनाचे निर्देश होते त्या निर्देशानुसार आयटीआय इमारतीसाठी २.६६ कोटी निधीस जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

             राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (दि.०३) रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी पालकमंत्र्यांकडे मतदार संघाच्या विविध विकास कामांसाठी निधीची मागणी करून प्रलंबित विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली.

          माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव शहरात अनेक शासकीय इमारती उभारून कोपरगाव शहराचे वैभव वाढविले. त्याचबरोबर होतकरू तरुणाईला व्यावसायिक शिक्षण मिळावे व त्यांना भविष्यात नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत बांधली होती. मात्र सदर इमारतीचे काम निधी अभावी रखडले होते. त्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून या इमारतीसाठी ७.६६ कोटी निधीस सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविली होती. त्यापैकी २.६६ कोटी निधी जिल्हा नियोजन समितीने उपलब्ध करून द्यावा असे शासनाचे निर्देश होते. त्या निर्देशाची अमलबजावणी करतांना सोमवार (दि.०३) रोजी जिल्हा नियोजन समितीच्या पार पडलेल्या बैठकीत या २.६६ कोटी निधीस पालकमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

            तसेच आ.आशुतोष काळे यांनी बैठकीत मतदार संघाच्या प्रलंबित विकासकामांना तातडीने निधी द्यावा अशी मागणी केली. त्या मागणीला पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कोपरगाव मतदार संघात मागील काही महिन्यांपासून बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे. या बिबट्यांमुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाची हानी होत असून शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यासाठी मतदार संघात ज्या ठिकाणी बिबट्याचे वास्तव्य आढळून येत आहे. त्याठिकाणी पिंजरे लावण्याची व्यवस्था करावी. मतदार संघातील सबस्टेशनची क्षमता वाढवण्यासाठी व ओव्हरलोड वीज रोहित्रामुळे शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा आदी मागण्या आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केल्या. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, खा.सदाशिव लोखंडे, खा.सुजय विखे, आ. प्राजक्त तनपुरे, आ.रोहित पवार, आ.संग्राम जगताप, आ.किरण लहामटे, आ. बबनराव पाचपुते, आ. मोनिका राजळे, आ.लहु कानडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here