पुसेगाव – सध्या आले पिकाला उच्चांकी दर मिळत आहे. आले व्यापारी संघटनेने गतवर्षी ठरल्याप्रमाणे खोडवा आले पिकाची खरेदी करताना जुने व नवे अशी प्रतवारी न करता एकाच दरात आले खरेदी करावे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आले व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा एकमुखी निर्णय आले व्यापारी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे.
पुसेगाव येथे आले व्यापारी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संयुक्त बैठक झाली. यावेळी सातारा जिल्हा आले व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेशशेठ जाधव, उपाध्यक्ष संतोष धनावडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, सूर्यकांत भुजबळ, खटाव तालुका आले व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत फडतरे, शंतनू वाघ, संदीप जाधव, संकेत चतूर, सूर्यभान जाधव, श्रीकांत लावंड, तानाजी देशमुख, दत्तू घाडगे, शरद खाडे उपस्थित होते.
सध्या आले पिकाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत आहे. आले पिकाचा खोडवा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र, काही व्यापारी खोडवा आले पिकाचा व्यवहार करताना जुने आणि नवीन आले अशी विभागणी करत आहेत. वेगवेगळे दर ठरवून शेतकऱ्यांना फसवत आहेत. याबाबतीत अनेक आले उत्पादक शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे तक्रारी केल्या.
त्यावर संघटनेने गांभीर्यपूर्वक लक्ष देत नेर धरण, खेड, कवडेवाडी, नांदगिरी परिसरात आल्याच्या धुनीच्या ठिकाणी
जाऊन खात्री केली. तर खेड परिसरातून नवे- जुने आले विभागणी केल्याची अनेक पोती आढळून आली. त्यानंतर वर्गवारी करून खोटे व्यवहार करणाऱ्या अमित जाधव, अमोल शिंदे व लखन केंजळे या आले व्यापाऱ्यांचा माल जप्त करून कारवाई करण्यात आली. यापुढील काळात खरेदी करताना आल्याची प्रतवारी करून शेतकऱ्यांची फसवणूक करू नये, असे मत अनिल पवार यांनी व्यक्त केले आहे.
पुसेगाव पोलिसांनी डोळ्यांवरची पट्टी काढावी
खटाव तालुक्यात यंदा पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरीप हंगाम पुर्णपणे धोक्यात आला आहे. सध्या खटाव तालुका दुष्काळाच्या छायेत आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. तर पुसेगाव परिसरात भुरटे चोर आल्याची चोरी करत आहेत. तोच चोरून आणलेला आल्याचा माल पुसेगाव पोलीस ठाण्यासमोरील काही जणांना विकत आहेत. पण, पुसेगाव पोलीस प्रशासनाने डोळ्यांवर लावलेली पट्टी काढली तरच, त्यांच्या ते निदर्शनास येईल, असा खोचक टोमणा सातारा जिल्हा आले व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेशशेठ जाधव यांनी यावेळी मारला.