आ.बाळासाहेब थोरात यांच्या उत्कृष्ट समन्वयाने भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात विविध घटकांचा उत्स्फूर्त पाठिंबा

0

संगमनेर  : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे झालेल्या विराट सभेत नफरत छोडो भारत छोडो या घोषणेने आपल्या भाषणाची सुरुवात करणारे भारत जोडो अभियानाचे महाराष्ट्राचे समन्वयक काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे राज्यभरातून भारत जोडो यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये समाजातील विविध घटकांनी मोठा सहभाग नोंदवल्याने खुद्द खासदार राहुल गांधी यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे कौतुक केले.
          लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी व एकतेचा आणि प्रेमाचा संदेश देण्यासाठी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर काढलेल्या भारत जोडो पद यात्रेला महाराष्ट्रात मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे राज्यातील भारत जोडो यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी होती. आमदार थोरात यांनी मागील दोन महिन्यापासून या भारत जोडो यात्रेची पूर्वतयारीचे नियोजन केले होते. महाराष्ट्रातून ३८२ किलोमीटरच्या प्रवासात विविध ठिकाणचे रस्ते, मुक्कामाची तयारी, दुपारची विश्रांती व जेवणाचे नियोजन, सभेंचे नियोजन, यामध्ये सहभागी होणाऱ्या विविध संघटना, पक्ष या सर्वांना निमंत्रण, भारत जोडो यात्रेतील कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था, सहभागी होणाऱ्या सर्वांची व्यवस्था, सुरक्षा, वैद्यकीय व्यवस्था, या व्यवस्थेसह राज्यभरातील सर्व नेत्यांची समन्वय पदाधिकाऱ्यांशी चर्चा अशी मोठी जबाबदारी आमदार थोरात यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात देगलूर येथे या यात्रेचे आगमन झाले. त्यानंतर गत १६ दिवसात नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा या पाच जिल्ह्यातून ३८२ किलोमीटरचा प्रवास या यात्रेने केला आहे. या काळात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यात भव्य सभा झाली तर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेगाव येथे विराट सभा झाली. याच दरम्यान विविध ठिकाणी, विविध पक्ष ,संघटना, विचारवंत, समाजातील विविध घटक यांच्या समवेत कॉर्नर मिटिंगा झाल्या.
भारत जोडो यात्रा पहाटे ४.३० वाजता सुरू होत होती. ५ वाजता ध्वजवंदन झाल्यानंतर यात्रेला सुरुवात होत असे. सकाळच्या सत्रात १४ किलोमीटर चालल्या नंतर दुपारी विश्रांती होत असे. त्यानंतर बुद्धिवादी, विचारवंत, लेखक,आदिवासी, शेतकरी, सामान्य माणूस यांच्याशी संवाद होत असे. विश्रांतीनंतर पुन्हा ही यात्रा सुरू होऊन सुमारे १२ किलोमीटरचा प्रवास करत. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची आरोग्य तपासणी केली जात असे. यासाठी सहा डॉक्टरांचे पथक आणि दोन रुग्णवाहिका ही सज्ज होत्या. या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना,कम्युनिस्ट पक्ष,मेघा पाटकर,समाजवादी पक्ष, पुरोगामी विचारांच्या विविध संघटना,शेतकरी संघटना,आदिवासी संघटना यांनी मोठा उत्स्फूर्त सहभाग घेतला.यावेळी आमदार थोरात म्हणाले की, देशात सध्या सर्वत्र महागाई व बेरोजगारी वाढली आहे. हे मूलभूत प्रश्न असून यावरून लक्ष हटवण्यासाठी धार्मिकतेचे राजकारण केले जात आहे. काँग्रेस पक्षाला  त्यागाची व बलिदानाची समृद्ध परंपरा असून खा.राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे देशातील युवकांमध्ये  नवचैतन्य निर्माण झाले असून ह्या यात्रेने देशात मोठे परिवर्तन होणार आहे. यात्रा ऐतिहासिक ठरणारी झाली असून यामध्ये महाराष्ट्रातील जनतेने मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला आहे. माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षातील सर्व वरिष्ठ नेते, इतर सर्व पुरोगामी पक्ष, महाविकास आघाडीतील सर्व घटक, साहित्यिक, आदिवासी संघटना, शेतकरी, तरुण, महिला यांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने महाराष्ट्राच्या इतिहासात या यात्रेची नोंद होणार आहे.ही यात्रा महाराष्ट्रातून आता मध्यप्रदेश मध्ये दाखल झाली आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या काटेकोर नियोजनाचे देशभरात कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here