आ. संजय शिरसाट यांनी ठेकेदाराला जीवे मारण्याची धमकी दिली : ॲड. सदावर्तेच्या आरोपाने खळबळ !

0
औरंगाबाद :
आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची वक्रदृष्टी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर पडली आहे. खंडपीठातील न्यायाधीशांच्या निवासस्थानांच्या बांधकामासाठी टेंडर भरू नये म्हणून बाबा कन्स्ट्रक्शनला धमकावल्याचा आरोप सदावर्तेनी शिरसाटांवर केला आहे. तुम्हाला औरंगाबादमध्ये काम करायचेय ना? आम्ही तुम्हाला मारून टाकू, अशी धमकी शिरसाट व त्यांच्या पीएने बिल्डरला दिल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.
 औरंगाबाद पश्चिम मतदारसंघावर सध्या भाजपाची नजर आहे. त्यातच मंत्रिमंडळात समावेश न केल्याने शिरसाट नाराज आहेत. त्यांची नाराजी वारंवार दिसूनही येत आहे. भाजपाकडून हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू असताना आता अचानक ॲड. सदावतेंनी आमदार शिरसाटांवर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. सदावर्ते यांनी आज, २८ सप्टेंबरला औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते म्हणाले, की ४७ कोटी रुपयांच्या टेंडर प्रक्रियेत टेंडर न भरण्याचे आमदार शिरसाटांनी बाबा कन्स्ट्रक्शनला सांगितले होते. ही धमकी रेकॉर्ड झाल्यानंतर उच्च न्यायालयात आमदार शिरसाट यांची तक्रार करण्यात आली आहे. तक्रार मागे घेण्यासाठी आमदार शिरसाट आणि त्यांच्या पीएने परत धमकावले. त्यानंतर बाबा कन्स्ट्रक्शनने रजिस्टर जनरलकडे या सगळ्यासंदर्भात अर्ज केला, अशी माहिती सदावर्तेनी दिली. बाबा कन्स्ट्रक्शन हे सदावर्तेचे पक्षकार आहेत. न्यायाधीशांच्या निवासस्थानांचे काम वंडर कन्स्ट्रक्शनला मिळावं म्हणून शिरसाटांचा प्रयत्न होता, असेही सदावर्ते म्हणाले.
 जलील यांच्यावर टीका… खासदार इम्तियाज जलील यांच्यावरही या वेळी ॲड. सदावर्तेनी टीकास्त्र सोडले. जलील पीएफआयचे सहानुभूतीदार आहेत का? असा सवाल त्यांनी केला. जलील यांची वक्तव्ये संभ्रम निर्माण करणारी असून, त्यांचे पीएफआयला समर्थन आहे का याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
राष्ट्रवादीने पीएफआयच्या बाबतीत आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी करत अॅड. सदावर्ते म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात मुंबईतील मलबार हिल आणि पुणे येथे तक्रार दाखल केली असून, या तक्रारीची चौकशी सीआयडी करत आहे. ते कधी रिअॅक्ट होत नाहीत पण काल ते रिअॅक्ट झाल्याचे मी पाहिले. त्याचं कारण काय? दाऊदने बॉम्बब्लास्ट केला तो काळ शरद पवार यांच्या सत्तेचा काळ होता, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here