येवला( प्रतिनिधी ) : सिंधू संस्कृतीचा जनक कृषी संस्कृतीचा प्रवर्तक श्रम प्रतिष्ठेचा पुरस्कार जलसंधारण व सिंचन व्यवस्थेच्या अध्य प्रवर्तक कष्टकऱ्यांचा राजा न्यायप्रिय सत्यप्रिय समतावादी संपत्तीचे समन्यायी वाटप करणारा अस्मानी संकटातही प्रजेला अभय देणारा सरकारी भांडारातून शेतीसाठी तगई देणाऱ्या धोरणांचा जनक अखंड कीर्तीचा महानायक बळीराजा Baliraja’s Honor Procession या राजाच्या सन्मानार्थ आज येवल्याची प्रसिद्ध हलगी वाजवत भव्य मिरवणूक काढण्यात आली. बळीराजाच्या वेशभूषेत शालेय विद्यार्थी सत्यजित चित्ते हा या मिरवणुकीत विशेष आकर्षण होता. येथील राष्ट्र सेवादल, शिक्षक भारती, सत्यशोधक डेमोक्रॅटिक पक्ष, छात्र भारती आदी पुरोगामी परिवर्तनवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी नऊ वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणुकीला सुरुवात केली. येवले शहराच्या मुख्य बाजारपेठेतून ही मिरवणूक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ येऊन तेथे मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रसेवा दलाचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष प्रा.अर्जुन कोकाटे, कॉ. भगवान चित्ते, कॉ.किशोर जाधव, राष्ट्र सेवा दलाचे नाशिक जिल्ह्याचे कार्याध्यक्ष दिनकर दाणे आदींनी मनोगते व्यक्त केली. या सन्मान मिरवणुकीत येवला शहर व तालुक्यातील विविध पुरोगामी संघटनांचे सुमारे 100 स्री-पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते.
*याप्रसंगी बोलताना प्रा अर्जुन कोकाटे म्हणाले,आपल्या समाजात हजारो वर्षापासून दोन प्रकारच्या विचारधारा सातत्याने कार्यरत आहेत. पहिली विचारधारा शोषणाच्या साधनांना जन्म देते,तर दुसरी विचारधारा ज्यांचे शोषण होते त्या सर्वहारा वर्गाचे शोषण थांबविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहते, त्यासाठी संघर्ष करीत असते. सिंधू जणांच्या उद्धाराचा प्रगतीचा बळीराजा हा पोशिंदा होता. शोषण पूर्व समाजात बहुजनांचे हितरक्षण करणारा तो महानायक होता. बलिप्रतिपदेच्या दिवशी वामनाने या महानायकाचा कट कारस्थान करून बळी घेतला,कारण हा राजा समता,न्याय,बंधुता आणि बहुजनांच्या समग्र उद्धारासाठी अत्यंत प्रामाणिकपणे कार्य करणारा राजा होता.बळीराजाच्या या गुणांमुळे त्याची सत्ता अवघ्या पृथ्वीवर निर्माण होते की काय या भीतीने मनुवादी भयग्रस्त होते म्हणूनच या बहुजनांच्या न्यायप्रिय राजाला संपविण्यासाठी वामनाने कपटकारस्थान केले होते आणि त्याचाच हा राजा बळी ठरला आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की,” आम्ही बळीयाची बाळे ” आपण सर्वजण म्हणजे बहुजन समाज बळी वंशातील आहोत.बळीराजा आपल्यासाठीच हुतात्मा झाला.त्या हुतात्मा दिनाचे अवचित्य साधून ही गौरव मिरवणूक येवल्यात काढण्यात आली.
यावेळी बोलताना काँ. भगवान चित्ते म्हणाले, हा गौरव सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध आहे. आजही शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे सर्व प्रकारचे हक्क नाकारले गेल्यामुळे शेतकऱ्याला जगणे मुश्किल झाले आहे म्हणूनच ही मिरवणूकशोषणाला विरोध करणारी ताकद देते. त्यातून सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता प्रस्थापित करण्याचा मार्ग मोकळा होतो आणि निष्कपटपणे संपविलेल्या निष्कपट मनाच्या बळीराजाला कपटाने संपवलेल्या वामनाच्या प्रवृत्तीचा आपण निषेध करीत असतो.काँ किशोर जाधव यावेळी बोलताना म्हणाले,* *बळीराजा हा कृषी संस्कृतीचा न्यायप्रिय राजा होता ज्याप्रमाणे तत्कालीन परिस्थितीत बळीराजाला सनातनी प्रवृत्तीने कारस्थान करून संपविले तशीच कारस्थाने आजही देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये सुरू आहेत त्याचाही निषेध या निमित्ताने आपण करूया यावेळी बोलताना राष्ट्रसेवा दलाचे दिनकर दाने म्हणाले बळीराजा हा शेतकरी आणि प्रजा हितदक्ष करणारा राजा असल्यामुळे,” शेतकरी सुखी तर जग सुखी ” या सूत्राचा तो पुरस्कार होता. म्हणून या सन्मान मिरवणुकीत बहुजन समाजातील स्त्री पुरुषांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदविला आहे.*
या बळीराजा सन्मान मिरवणुकी पुरुषोत्तम पाटील, एड्. शरद कोकाटे, रामनाथ पाटील, नवनाथ शिंदे, बाबासाहेब कोकाटे, राजेंद्र जेजुरकर, शिवाजी साताळकर,उत्तम बंड, विनोद सोनवणे,खुशाल गायकवाड,सुखदेव आहेर, अमोल सोनवणे, भाऊसाहेब जगताप, सागर दिघे, प्रा जनार्धन धनगे, प्रा महेंद्र विघे, सुंदर जाधव, सुनिता जाधव, दर्शना सोनवणे, ऐश्वर्या चित्ते, संकेत जाधव, सांची चित्ते, श्रावण सोनवणे, दिलीप काळे, संदीप सोनवणे, कुणाल कोकाटे, हलगी वादक खंडू खैरनार व आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.