जालना / सातारा : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने राज्यभरात संतापाचा उद्रेक पाहायला मिळतोय.
याप्रकरणी उदयनराजे भोसले यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. इतर समाजाला न्याय, मग मराठा समाजाला न्याय का नाही? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
उदयनराजे भोसले म्हणाले, “हा जो अनुचित प्रकार घडला त्यासंबंधी चौकशी होईल. लाठीचार्ज करणाऱ्यांना तात्काळ निलंबित करा. मराठा आंदोलकांना आरक्षण मिळायला हवं. खरंतर हे फार वर्षांपूर्वी व्हायला होतं. ज्यावेळेस अशाप्रकारचा अन्याय होतो त्यावेळेस उद्रेक होणं स्वभाविक आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, आपल्या शांततेत आंदोलन करायचं आहे.”
“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची काल माझी भेट झाली. या दोन-तीन दिवसातच चर्चा करुन लवकरात लवकर आंदोलकांची भेट घालून देऊ. एक-दोन नाही तर 57 महामोर्चे झाले पण कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. पण त्याचा असा अर्थ नाही की मराठा समाज सहन करतो म्हणून प्रतिक्षा करावी. इतर समाजाला न्याय, मग मराठा समाजाला न्याय का नाही? मराठा समाजाकडे दुर्लक्ष केलं गेलं.” असं ते यावेळी म्हणाले.