उरण दि १०(विठ्ठल ममताबादे) : भारताला मोठया प्रमाणात समुद्र किनारा लाभला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यालाही मोठया प्रमाणात कोकण किनारपट्टीच्या माध्यमातून समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्र किनारी मच्छिमार व्यवसाय करणाऱ्या कोळी बांधवांची वस्ती मोठया प्रमाणात आहे. मच्छिमार करून कोळी बांधव आपली उपजीविका करतात. मासेमारी हे एकमेव उपजीविकेचे साधन कोळी समाज बांधवांचे आहे. मात्र काही वर्षात समुद्र किनारी भारत सरकारचे तसेच महाराष्ट्र सरकारचे अनेक प्रकल्प,रासायनिक कंपन्या, उपक्रम आल्याने समुद्र किनारी राहणाऱ्या कोळी बांधवांच्या जमिनीवर मोठया प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. समुद्र किनारी व समुद्रात मातीचे भराव टाकून अतिक्रमण केले जात आहेत तर कुठे जबरदस्तीने जमीन संपादन केले जात आहेत. समुद्र किनारी तसेच समुद्रात अतिक्रमण झाल्याने मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या कोळी बांधवांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळून त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
विविध खाजगी व शासकीय प्रकल्पामुळे कोळी बांधवांवर अनेक मोठया प्रमाणात अत्याचार झाले आहे. शासन दरबारी सुद्धा कोळी बांधवांच्या समस्या कडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांचे, मच्छिमार करणाऱ्या व्यवसायिकांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी व शासनाच्या विविध सेवा, सवलती, योजणांचा लाभ घेण्यासाठी मच्छिमारांच्या प्रश्नांना, समस्यांना न्याय देण्यासाठी त्यांचे अधिकार व हक्क त्यांना मिळवून देण्याच्या उद्देशाने उरण शहरातील कोळीवाडा येथे रविवार दिनांक ८/१२/२०२४ रोजी दुपारी ४ वाजता उरण कोळीवाडा पारंपारिक मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित या मच्छिमार सोसायटीचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात करण्यात आले. यावेळी मच्छिमार नेते रमेश कोळी, फादर मार्शल लोपेझ, मच्छिमार नेते रामदास कोळी, सामाजिक कार्यकर्ते पर्यावरण प्रेमी नंदकुमार पवार, प्राची कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम वाजत गाजत मिरवणूक काढून मंदिर व प्रार्थना स्थळाना भेट देऊन आशीर्वाद घेउन कार्यक्रम स्थळी सदर सोसायटीच्या ऑफिसचे व सोसायटीच्या नामफलकाचे उदघाटन मच्छिमार नेते रमेश कोळी, सामाजिक कार्यकर्ते पर्यावरण प्रेमी नंदकुमार पवार, फादर मार्शल लोपेझ यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. यावेळी उपस्थित कोळी बांधव, मच्छिमार करणाऱ्या मच्छिमार बांधवांना व्यासपीठावरील मान्यवरांनी मार्गदर्शन केले. गव्हाण येथील मच्छिमारांचे युवा नेते हितेश कोळी यांनी सांगितले की उरण तालुक्यात कुठेही मच्छिमार संघटना अथवा सोसायटी स्थापन झाल्या नव्हत्या. मात्र मच्छिमारांचे नेते रमेश कोळी यांच्या नेतृत्वा मुळे कोळी समाज एकत्र आला. कोळी समाजाच्या समस्या विषयी जनजागृती झाली त्यामुळे रमेश कोळी यांच्या नेतृत्वाखाली अनेक संघटना, सोसायट्या स्थापन झाल्या. आता सर्वांनी आपापसातील मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. असे आवाहन हितेश कोळी यांनी केले. तर नंदकुमार पवार यांनी कोळी समाजावर कसा अन्याय झाला व कोळी समाजाचे प्रश्न कसे सोडवावे या विषयी मार्गदर्शन करत सर्वांनी एकत्र येऊन समाजाचे हे काम पुढे नेण्याचे आवाहन केले.फादर मार्शल लोपेझ यांनी कोळी हा समुद्राचा, मुंबईचा राजा आहे. कोळी हा येथील स्थानिक भूमीपुत्र आहे. मात्र विकासाच्या नावाखाली कोळी बांधवांचे, मच्छिमार व्यावसायिकांचे गळे दाबन्याचा प्रयत्न केले जात आहेत. मच्छिमारांच्या, कोळी बांधवांच्या जमिनीवर मोठया प्रमाणात अतिक्रमण केले जात आहेत. त्यामुळे आता हे अन्याय कोणीही सहन करू नका. गाफिल राहू नका. आपल्या सर्वांना सोसायटीच्या ब्रीद वाक्या प्रमाणे कष्टाकडून समृद्धी कडे जायचे आहे. पारंपारीक वारसा जपायचे आहे. असे सांगत नवीन स्थापन झालेल्या सोसायटीच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. व मच्छिमार बांधवांनी स्थापन केलेल्या सोसायटीचे कौतुकही केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मच्छिमारांचे नेते रमेश कोळी यांनी सांगितले की २००५ पासून कोळी बांधवांनी मच्छिमारांच्या समस्या सोडविण्यास सुरवात केली. शासन दरबारी मच्छिमारांच्या प्रती मोठया प्रमाणात उदासीनता आहे. शासनाला मच्छिमारांचे प्रश्न सोडवायचेच नाही. त्यामुळे शासन मच्छिमारांच्या समस्या कडे नेहमी दुर्लक्ष करीत आलेला आहे. आजही मच्छिमारांच्या समस्या कडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. मात्र सोसायटी स्थापन करून तसेच संघटना स्थापन करून मच्छिमारांच्या प्रलंबित विविध समस्यांवर आवाज उठविण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोणीही स्वतःला कमी समजू नये.
आम्ही तुमच्या सोबत आहोत. कोणतेही काम असल्यास आम्हाला आवाज दया आम्ही तुम्हाला सहकार्य करू. मदत करू. आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत. सोसायटी स्थापन झाल्याने सर्वांनी एकत्र मिळून काम करा. अन्याया विरोधात आवाज उठवा. शासनाच्या विविध सेवा योजणांचा, सवलतींचा लाभ घ्या असे आवाहन रमेश कोळी यांनी सर्वांना केले.सोसायटीच्या उदघाटन प्रसंगी कोळी बांधव, मासेमारी करणारे व्यावसायिक मोठया प्रमाणात उपस्थित होते. उरण कोळीवाडा येथे नव्याने सोसायटीची स्थापना झाल्याने मच्छिमार बाधवांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उरण कोळीवाडा पारंपारीक मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित या सोसायटीचे अध्यक्ष डोमनिक कोळी, सचिव श्रद्धा कोळी, खजिनदार पीटर कोळी, सहसचिव वेरोनिक कोळी, सहखजिनदार संगीता कोळी, संचालक मनवेल कोळी, संचालक प्रवीण कोळी, सामाजिक कार्यकर्ते मोजेस कोळी व मच्छिमार सोसायटीच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन संगीता कोळी यांनी तर आभार प्रदर्शन डोमनिक कोळी यांनी केले.नव्याने सोसायटीची स्थापना झाल्याने मच्छिमारांच्या समस्या, प्रश्न सुटण्यास हातभार लागणार असल्याने मच्छिमार बांधवांनी समाधान व्यक्त केले.