रोजगार,आरोग्य,शिक्षण,मनोरंजनाची सुविधा आणि मैदानाचा अभाव ;नागरिकांमध्ये मोठया प्रमाणात नाराजी
उरण दि २(विठ्ठल ममताबादे )
आता सर्वांना निवडणुकिचे वेध लागले असून सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.मात्र उरण विधानसभा मतदार संघांत वर्षानुवर्षे अनेक समस्या प्रलंबितच आहेत. त्याबाबत ठोस उपाययोजना होताना दिसून येत नाही.उरण, पनवेल व खालापूर या तीन तालुक्यानी मिळून बनलेल्या राज्यातील औद्योगिक मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात रोजगार, आरोग्य, शिक्षण,खेळाचे मैदान,पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि नागरिकांसाठी मनोरंजनाचं साधन यांचा अभाव आहे. यातील अनेक समस्या चर्चिल्या गेल्या मात्र त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. अनेक पक्ष विकासाचे दावे करीत आहेत. या परिसरात दोन लाख कोटींची विकास कामे झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र शाश्वत विकासाची प्रतीक्षा आहे. जनतेला भेडसावणाऱ्या या ज्वलंत समस्या या विधानसभा निवडणुकीत चर्चिल्या जाणार आहेत.
राज्यात २००९ मध्ये पुनर्रचीत झालेल्या या मतदारसंघात चौथ्यांदा येथील मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यावेळी या नागरी समस्या सोडविण्यात अपयशी ठरलेल्या पक्ष आणि नेत्यांना प्रश्न विचारणार आहेत. उरण तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र,पनवेल मधील नवी मुंबई विमानतळ व नागरी परिसर खलापूर मधील शेतकरी आणि आदिवासी असा संमिश्र वस्तीचा मतदारसंघ आहे. मतदारसंघात ओएनजीसी तेल शुद्धीकरण प्रकल्प, जेएनपीटी बंदर व त्यावर आधारित उद्योग, वायू विद्युत केंद्र,भारत पेट्रोलियमचा घरगुती वायू भरणा प्रकल्प,पनवेल व रसायनी परिसरातील खाजगी प्रकल्प असा हा औद्योगिक केंद्र असलेला मतदारसंघ आहे. तर सिडकोच्या माध्यमातून या परिसरात नागरी वस्ती ही विस्तारु लागली आहे. यात नव्याने सुरू झालेला सागरी अटलसेतु व उरण नेरुळ लोकल त्याचप्रमाणे अलिबाग विरार कॉरिडॉर तीन राष्ट्रीय महामार्ग यामुळे दळणवळणाचे जाळे ही याच मतदारसंघात विणले गेले आहे. मात्र सर्वसामान्य जनता वास्तव्य करीत असलेल्या गाव व पाड्यांना जोडणारे मार्ग यांची दुरवस्था आहे. मतदारसंघातील अनेक पाड्यावर ये जा करणाऱ्या मार्गांची प्रतीक्षा आहे. या मतदारसंघात एकही सुसज्ज असे रुग्णालय नाही. त्यामुळे येथील सर्वसामान्य नागरिकांना पनवेल व नवी मुंबई येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयाचा आसरा घ्यावा लागत आहे. येथील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र अनेक समस्यांनी ग्रासलेली आहेत. उद्योगासाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक या मतदारसंघात झालेली आहे. मात्र त्या तुलनेत स्थानिकांना रोजगार उपलब्ध झालेला नाही. तर असलेल्या रोजगारात घट होऊ लागली आहे.
येथील अनेक उद्योग बंद पडल्याने हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांच्या कवेत हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात रसायनी येथील एक अभियांत्रिकी महाविद्यालय वगळता येथे उच्च शिक्षणाची व्यवस्था नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना नवी मुंबई,मुंबई किंवा पनवेल मध्ये जाऊन उच्च शिक्षण घ्यावे लागत आहे. नागरिकांना मनोरंजन व करमणूक यासाठी सिनेमा,नाट्यगृह यांची व्यवस्था नाही. तसेच मतदारसंघात राष्ट्रीय पातळीवरील उत्तम खेळाडू तयार झाले आहेत. त्यांच्यासाठी हक्काचे मैदान उपलब्ध नाही. यासर्व नागरी सुविधा पुरविण्यात आता पर्यंतचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरले असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. वर्षांनुवर्षे समस्या सुटत नसल्याने नागरिकांमध्ये मोठया प्रमाणात नाराजी आहे.त्यामुळे या निवडणुकीत येथील मतदान कोणाच्या पारड्यात यश टाकतात, कोणाला निवडून देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.उरण विधानसभा मतदार संघांचे प्रश्न सोडविणाऱ्या उमेदवाराला मतदान करणार असल्याचे नागरिक सांगत आहेत. आता कोण निवडून येणार याविषयीं नागरिकांमध्ये कुतूहल आहे.