(राजेंद्र उंडे )
15 ऑक्टोबर 2022 ला प्रसिद्ध अशा जयसिंगपूरच्या विक्रमसिंग घाटगे मैदानावरती 21 वी ऊस परिषद होत आहे. मागील सलग 20 वर्ष या मैदानावर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात लाखो शेतकरी एकत्र येतात. अन स्वतःच्या ऊसाचा भाव स्वतः ठरवतात.भारतामध्ये स्वतःच्या शेतमालाचा भाव शेतकऱ्यांनी स्वतः ठरवण्याची अन तो कारखानदाराशी वेळ प्रसंगी रक्तरंजित संघर्ष करून पदरात पाडुनच घेण्याची ऐतिहासिक एकमेव घटना आहे. हे सलग 20 वर्ष अविरत सुरू आहे.गेल्या 20 वर्षापूर्वी 460 रुपये ऊसाचा भाव 750 रुपये झाला
अनेकांना प्रश्न पडला असेल की राजू शेट्टींची पहिली ऊस परिषद केव्हा व कशी सुरू झाली ? 15 आँक्टोबर 2001 रोजी पहिली ऊस परिषदेची मुहुर्तमेढ रोवण्यात आली 2021 वर्ष… शेजारी कर्नाटक राज्यामध्ये ऊसाला 800 रुपये भाव मिळत होता.आणि कोल्हापूर मध्ये 460 रुपये. ही तफावत बघून शेतकरी संघटनेचं तरुण नेतृत्व म्हणून नावारूपाला आलेल्या राजू शेट्टींनी कोल्हापूर मधील साखर कारखान्यांनी देखील कर्नाटक प्रमाणे आठशे रुपये प्रति टनाला पहिली उचल द्यावी. यासाठी आंदोलन सुरू केले.ऊस तोडबंद केली, कारखानदार ऐकत नाही तोपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नाही. अशी भूमिका राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी घेतली. चार -पाच साखर कारखान्यांचा ऊस राजू शेट्टींनी रोखून धरला. कारखाने बंद होऊन चारपाच दिवस लोटले तरी कारखाने 800 रुपये पहिली उचल मान्य करायला तयार नव्हते . कोल्हापूर जिल्हा म्हणजे मात्तबर साखर सम्राटांचा.. राजू शेट्टी सारख्या एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने सरळ सरळ आव्हान देणे त्यांना कसे पचणी पडणार ? सगळे साखर सम्राट हे सत्ताधारी होते. राजू शेट्टीने सुरू केलेलं हे आंदोलन पोलीस बळाचा वापर करून कायमचं मोडीत काढायचं.आणि साखर सम्राटांना धक्का लावण्याचा इथून पुढे कोणी प्रयत्न करू नये अशी जन्माची अद्दल आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना घडवायची असं त्यांनी ठरवलं ..यासाठी 10 नोव्हेंबर 2001 ला आंदोलनात अग्रेसर असणाऱ्या मौजे डिग्रज गावांमध्ये रात्रीच्या बारा एक वाजता एसआरपी पाठविली . प्रत्येक दरवाजा उघडून घरातील महिला, वृद्ध, लहान मुलं अगदी बळांतीन स्त्रियांना देखील प्रचंड मारहाण केली .
दुसरा दिवस म्हणजे 11 नोव्हेंबर 2019 रोजी साखर सम्राटांच्या काही बगलबच्च्यांनी आम्ही आमच्या शेतातला ऊस वाजत- गाजत कारखान्याकडे नेऊ अशी भूमिका घेतली. चार-पाचशे लोक वाजंत्री लावून ऊस कारखान्याकडे घेऊन येताय ही बातमी राजू शेट्टींना कळली . दहा -पंधरा सहकारी घेऊन राजू शेट्टी शिरोळच्या चौकात उभे राहिले.आदल्या रात्री प्रचंड पोलीस बळाचा वापर झाला होता.आता शेतकरी राजू शेट्टीला साथ देणार नाही.अस सगळ्यांना वाटत होतं.पण राजू शेट्टी जीवाची पर्वा न करता शिरोळच्या चौकात उभे आहे.ही बातमी आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना कळली.अन लोकांचे लोंढे चे लोंढे शिरोळच्या चौकाकडे यायला सुरुवात झाली. उसाची मिरवणूक शिरोळच्या चौकात येईपर्यंत दहा पंधरा हजार शेतकऱ्यांचा जमाव राजू शेट्टींच्या बाजूने उभा राहिला. साखर सम्राट यांनी केलेला कुटील डाव फसला होता .पोलीस बळाचा वापर करून लोकांना भयभीत करायचं. ही नीती निष्प्रभ ठरली होती. कारण इतिहासातील तो दिवस या देशातल्या शेतकऱ्यांना एका खंबीर नेतृत्वाचा परिचय करून देणारा दिवस ठरणार होता.शेतकऱ्यांसाठी लढणारा सूर्य उगवणार होता.
जमा झालेले शेतकरी आणि कारखान्यांचे बगलबच्चे यांची जोरदार बाचाबाची सुरू झाली. मोठा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी होता. त्या गोंधळामध्ये कोणीतरी जाणीवपूर्वक राजू शेट्टींना बातमी दिली नृहसिंहवाडी मध्ये एसआरपी शेतकऱ्यांना मारहाण करते आहे.यामुळे राजू शेट्टींनी तिथे बंदोबस्ताला असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं आम्ही लोकशाहीच्या मार्गाने शांततेने आंदोलन करत आहोत. तुम्ही पोलीस बळाचा वापर करत असाल तर आम्हीही कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. ते पोलीस अधिकारी सांगत होते की सर्व चार्ज माझ्याकडे आहे.मी ऑर्डर केल्याशिवाय एसआरपी कुठेही कारवाई करणार नाही .तुम्हाला खोटं वाटत असेल तर आपण दोघे जाऊन त्या गावाला भेट देऊन येऊ .म्हणून राजू शेट्टी आणि ते संबंधित पोलीस अधिकारी वेगवेगळ्या मोटरसायकल वरून नृहसिंहवाडीकडे निघाले.राजू शेट्टी आंदोलन स्थळावरून शेतकऱ्यांना मारहाण होतेय म्हणून नृहसिंहवाडी कडे चालले . ही बातमी शिरोळच्या चौकातील शेतकऱ्यांना समजल्यावर ते प्रचंड चिडले.अन तिथे साखर कारखानदाराच्या बगलबच्च्यांची आणि शेतकऱ्यांची तुफान हाणामारी सुरू झाली.ही बातमी कळल्यावर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला परत यावं लागलं. आणि राजू शेट्टी एकटेच जात असताना साखर सम्राटांच्या गुंडांच्या तावडीत सापडले.त्यांनी प्रचंड मारहाण केली. राजू शेट्टी बेशुद्ध पडले की मेले ? म्हणून राजू शेट्टींना टाकून गुंड पसार झाले.
अर्धमेल्या अवस्थेतील राजू शेट्टींना आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी दवाखान्यात नेले आयसीयु मध्ये भरती केलं. परंतु या हल्ल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी रस्त्यावर आले.अन सगळे साखर कारखाने बंद झाले. राजू शेट्टी दवाखान्यात होते. काही दिवसांनी शुद्धीवर आले आणि त्याही अवस्थेत त्यांनी ऊस दराचे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.ॲम्बुलन्स मध्ये जाऊन अनेक ठिकाणी सभा घेतल्या.सभा म्हणजे काय कसेबसे दोन चार वाक्य बोलायचे.पण त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढत गेली.
आंदोलन सुरू होऊन दहा-पंधरा दिवस झाले होते.ऊस दराची कोंडी फुटत नव्हती. कारखाने बंद होते अन शेतकरी ऊस द्यायला तयार नव्हते. यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. या साठी शेतकऱ्यांशी चर्चा करून एक मध्यस्थीचा प्रस्ताव आपण कारखानदारांपुढे ठेवावा. या हेतूने राजू शेट्टी यांनी ते ज्या जयशिंगपूरच्या प्रिदर्शनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते .त्याच्या जवळच्याच विक्रमसिंह मैदानात 27 नोव्हेंबर ला शेतकऱ्यांची पहिली ऊस परिषद बोलावली. प्रचंड संख्येने शेतकरी तिथं जमा झाले.अन तिथं समजूतदारपणा म्हणून 800 रुपये ऐवजी 750 रुपये पहिली उचल घ्यायला आम्ही तयार आहे. कारण शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966 नुसार एमएसपी 750 बसते आमची मागणी अवास्तव नाही.कायद्याला धरून आहे.तुम्हाला हा शेतकऱ्यांचा निर्णय मान्य नसेल तर कारखाने सुरू होणार नाही.अशी समजुतीची पण आक्रमक भूमिका राजू शेट्टी यांनी लाखो शेतकऱ्यांच्या मेळाव्यात मांडली.
राजू शेट्टींच्या या प्रस्तावावर कोल्हापूर जिल्ह्यातील जेष्ठ नेते सदाशिव मंडलिक यांनी जिल्हा बँकेत सर्व साखर कारखानदारांची बैठक बोलावली.त्या बैठकीत विचार विनिमयाला सुरुवात झाल्या झाल्या राजू शेट्टींच्या आरपार भूमिकेमुळे दत्त साखर कारखान्याचे चेअरमन सा.रे.पाटील यांनी राजू शेट्टींची मागणी मला मान्य आहे.मी 750 रुपये उचल देऊन उद्या पासून साखर कारखाना सुरू करणार आहे . असे जाहीर करून टाकले.सारे पाटलांची भूमिका पुढे सर्व कारखानदारांना घ्यावी लागली. पहिल्या ऊस परिषदेत शेतकऱ्यांनी मागितलेला भाव शेतकऱ्यांच्या पदरात पडला. 460 रुपयांची पहिली उचल 750 झाली अन नवा इतिहास घडला.या देशातल्या शेतकऱ्याने पहिल्यांदाच स्वतःच्या मालाचा भाव स्वतः ठरवला. अन तो पदरात पाडून घेतला.ही किमया राजू शेट्टींच्या रक्तरंजित संघर्षाने साध्य झाली होती… त्या पहिल्या रोमांचकारी ऊस परिषदेला 20 वर्ष झालेत .. आज ही वेताळ विक्रमाच्या कथेसारखी राजू शेट्टींची लढाई सुरू आहे. दरवर्षी कारखाने सुरू करायचा हंगाम आला की एफ आर पी वर संघर्ष होतो.राजू शेट्टी विक्रमराजासारखा प्रश्न सोडवतात ..वेताळ मानगुटीवरून उतरला असे वाटत असतानाच पुन्हा शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन राजू शेट्टींच्या मानगुटीवर बसतो.पुन्हा संघर्ष ..पुन्हा आंदोलन.. किती दिवस हे चालणार माहीत नाही. दोघेही थकत नाही. दरवर्षी ऊस परिषद होते. राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकरी भाव ठरवतात आणि वेळप्रसंगी संघर्ष करून तो पदरात पाडतातच. ही परंपरा अविरत सुरू आहे .या वर्षी 15 ऑक्टोबर ला त्याच मैदानावर लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत 21 वी ऊस परिषद होतेय.या वर्षी ऊसाचा भाव काय मागायचा हे ठरवलं जाणार..म्हणून इतिहासाचे साक्षीदार व्हायला शेतकरी सहभागी होतील..!!