मुंबई : अंधेरी पूर्व पोट निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध भाजप असा हा सामना रंगणार आहे. अशातच आता भाजपनं अंधेरी पूर्व येथील पोट निवडणूक लढवू नये, ऋतुजा लटके यांच्यासाठी ही जागा सोडावी, असं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे. पण राज ठाकरेंनी ही भूमिका का घेतली, हे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आधी राज ठाकरे पत्रात काय म्हणाले, ते पाहूया.
“आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका,” असे ट्वीट करून राज ठाकरे यांनी आपले पत्र त्यासोबत जोडले आहे.
“रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते, शिवसेना शाखाप्रमुख ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. त्यांची पत्नी ऋतुजा लटके या आमदार होतील हे भाजपने पाहावे. त्या आमदार झाल्यावर दिवंगत नेत्याच्या आत्म्याला शांती मिळेल अशी आपली भावना आहे,” असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
‘पत्राचा अर्थ ऋतुजा लटकेंना पाठिंबा असा नाही’
“राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना निवडणूकीतून माघार घेण्यासंदर्भात पत्र पाठवलं आहे. पण त्याचा अर्थ त्यांनी निवडणुकीत ऋतुजा लटकेंना पाठिंबा दिला आहे, असा होत नाही,” असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी व्यक्त केलं.
देशपांडे म्हणाले, की “राज ठाकरे यांचं मुख्य लक्ष्य मुंबई महापालिका निवडणुका आहे. अंधेरीच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप लढत होत आहे. लटके विरुद्ध पटेल अशी ही निवडणूक मराठी विरुद्ध अमराठी मुद्द्यावर होईल. त्या निमित्ताने मराठी विरुद्ध गुजराती हा मुद्दाही चर्चेत येईल.
“अशा वेळी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपण योग्य बाजूला असावं, ही भूमिका राज ठाकरेंनी या पत्राच्या माध्यमातून घेतल्याचं दिसून येतं.”
देशपांडे पुढे सांगतात, “मनसे एरवीही पोटनिवडणुका कधीही लढत नाही. पण आज त्यांनी यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं, याचा अर्थ त्यांनी ऋतुजा लटके यांना पाठिंबा दिला असं होत नाही. उलट ते गप्प राहिले असते, तर भाजपसोबत आहेत, असा त्याचा अर्थ काढण्यात आला असता. त्यामुळेच त्यांनी वरील पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.”
‘उद्धव ठाकरेंना फायदा होऊ नये म्हणूनच…’
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांच्या मते, “अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेना जिंकल्यास तो विजय उद्धव ठाकरे गटासाठी मोठा विजय मानला जाईल. मुंबई महापालिका निवडणुकीत या विजयाचा उद्धव ठाकरे गटाला फायदा होऊ शकतो.”
“हे टाळण्यासाठीच निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी राज ठाकरेंची भूमिका दिसत आहे. उद्धव ठाकरे यांना पुन्हा उभारी मिळू नये, यासाठीच राज ठाकरे प्रयत्न करत आहेत.”
या पत्राचं दुसरं संभाव्य कारणही चोरमारे यांनी सांगितलं. ते पुढे सांगतात, “कोणतीही निवडणूक जाहीर झाल्यानंतर अचानक कुणीही माघार घेत नसतं. माघार घेण्यापूर्वी त्यासाठीची मानसिकता तयार करावी लागते. त्यासाठीच राज ठाकरेंच्या मार्फत हे पाऊल उचलल्याचं दिसून येतं.”
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राही भिडे यांच्या मते, “ऋतुजा लटके यांच्याविषयी नैसर्गिक सहानुभूति आहे. त्यामुळे या निवडणुकीत विजय मिळवणं विरोधी पक्षांसाठी म्हणजेच भाजपसाठी अवघड आहे.”
“उलट भाजपने उमेदवार न दिल्यास भाजपचीच प्रतिमा उंचावेल. शिवाय, अंधेरी पूर्व भागात शिंदे गटाचं फारसं प्रस्थ आहे, असं वाटत नाही. त्यामुळे भाजपच्या प्रतिमा निर्मितीसोबतच शिवसेनेची सहानुभूति मिळवण्याचा प्रयत्न राज ठाकरे त्यांच्या पत्राच्या माध्यमातून करत आहेत,” असं भिडे यांनी सांगितलं.