एकनाथ शिंदे नवा डाव टाकणार? या नव्या 5 चेहऱ्यांना संधी देणार?; खेळीमागचं गणित काय?

0

मुंबई प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीनंतर आता काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले. महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.
तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे नवीन सरकार स्थापन झालेल असलं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यातच आता अनेक आमदार मंत्रीपद मिळावे, यासाठी लॉबिंग करत आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवीन डाव टाकणार आहेत. एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून ५ नवीन चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी देणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या १४ डिसेंबरला मंत्रीमंडळ विस्तार केला जाणार आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात रात्री एक बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळ खात्याच्या वाटपावरून चर्चा करण्यात आली. यानंतर आज मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबतीत एक अंतिम बैठक होईल, असे बोललं जात आहे. त्यातच आता मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाकडून दोन मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. तर ५ नवीन आमदारांना मंत्रि‍पदाची संधी मिळणार आहे.
मंत्र्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिवसेनेच्या माजी आणि संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट केला जाणार आहे. गेल्या मंत्रिमंडळात गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई, उदय सामंत, तानाजी सावंत, दादा भुसे, दीपक केसरकर यांच्याकडे मंत्रीपदे देण्यात आली होती. आता भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे या पाच जणांना मंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवीन खेळी काय?
या पाच नवीन चेहऱ्यांपैकी भरत गोगावले हे कोकणातले आहेत. शिवसेना कोकणात वाढवण्यासाठी भरत गोगावले यांना मंत्रि‍पदाची संधी दिली जाईल, असे म्हटले जात आहे. तर संजय शिरसाट, अर्जुन खोतकर हे दोघेही मराठवाड्यातील नेते आहेत. मराठवाड्यात पक्षविस्तारासाठी त्यांची मदत होणार आहे. तसेच प्रताप सरनाईक हे ठाणे, तर विजय शिवतारे हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. या दोघांचाही जिल्ह्यात पक्ष विस्तारासाठी फायदा होईल, यासाठी मंत्रिपद दिले जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर
दरम्यान आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अस्तित्व निर्माण करणे फार गरजेचे आहे. त्यामुळे सत्ताधारी कामाला लागले आहे. यामुळे आता एकनाथ शिंदे हे मुंबईतील एखाद्या आमदाराला मंत्रिपदाचे तिकीट देणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here