दाम्पत्याचे प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक
अहमदनगर – निर्मलनगर येथील डोके विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रिबेका क्षेत्रे यांची रस्त्यात पडलेली किमती ऐवज असलेली पर्स सुरेंद्र बिदे व संगिता बिदे या दाम्पत्याने तोफखाना पोलिस स्टेशनला जमा केली. पोलिसांनी पर्स रिबेका क्षेत्रे यांना पो.नि.मधुकर साळवे यांच्या उपस्थितीत सुपूर्द केल्यानंतर त्यांनी बिदे दाम्पत्य व तोफखाना पोलिसांचे आभार मानत. दाखविलेली माणुसकी व प्रामाणिकपणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या आठवड्यात रिबेका क्षेत्रे निर्मलनगर ते श्रीराम चौक दरम्यान दुचाकीवरुन जाताना त्यांची सुमारे 1 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, रोख 17 हजार रुपये, 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असलेली पर्स गंगा लॉन जवळ पडली. पण त्यांच्या लक्षात आले नाही. घरी गेल्यावर पर्स पडल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पुन्हा त्या रस्त्याने जाऊन पाहणी केली, परंतु पर्स मिळून न आल्याने त्यांनी तोफखाना पोलिस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली. दरम्यान सुरेंद्र बिदे व संगिता बिदे यांना ती पर्स मिळाली ती त्यांनी तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये आणून दिली. पोलिसांनी रिबेका क्षेत्रे यांच्याशी संपर्क साधून पर्स मिळाल्याचे सांगितले व पोलिस स्टेशनला बोलावून घेतले. त्यांना पो.नि.मधुकर साळवे यांच्या उपस्थितीत पर्स देण्यात आली. पर्स मिळाल्याचा त्यांच्या चेहर्यावर मोठा आनंद होता, त्याचबरोबर बिंदे दाम्पत्यांचा प्रामाणिकपणा व पोलिसांच्या सहकार्याबद्दल त्यांनी भावूक होत मन:पुर्वक आभार मानले.
यावेळी रिबेका क्षेत्रे यांनी बिदे दाम्पत्यांना बक्षिस दिले परंतु त्यांनी त्यास नम्रपणे नकार देत हे आमचे कर्तव्य होते, ते पार पाडले असल्याचे भावना व्यक्त केली.