विविध विषयावर झाली सकारात्मक चर्चा.
उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाने दि.२४ ऑगस्ट २०२४ रोजी नागपुरातील रेशीमबाग मैदानापासून राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर काढलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उपोषणाच्या ६ व्या दिवशी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटनेच्या शिष्टमंडळास गुरुवार दि.२९ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांच्या नागपुरातील देवगिरी या शासकीय निवास स्थानी दुपारी २ वाजता चर्चा करण्यास बोलावन्यात आले होते. या वेळी संघटनेकडून हरियाना येथील शासन निर्णय व कामगारांचा वस्तुनिष्ठ अहवाल त्यांच्याकडे संघटनेकडून सादर करण्यात आला.
तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ व समानता व कंत्राटदार विरहित कामगार पद्धती करिता हरियाना पॅटर्न या दोन प्रमुख मागण्यांवर संघटना ठाम असून ठोस धोरणात्मक निर्णय तातडीने झाला पाहिजे अशी भूमिका संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांनी मांडली
या पूर्वी ऊर्जामंत्री यांनी यापुर्वी अनेकदा दिलेल्या आश्वासनाची पूर्तता प्रशासनाकडून झाली नाही. प्रामुख्याने भरती मध्ये अनुभवी कामगारांना जादा मार्क, वयात सूट,विशेष आरक्षण, बँक अकाउंट द्वारे थेट खात्यात पैसे, कामगारांना मेडिक्लेम व अपघात विमा व भ्रष्ट कंत्राटदारांवर कारवाई न होऊन कामावरून कमी केलेले कामगार कामावर न घेतल्याने कामगारांमध्ये नाराजी निर्माण झाली व याच मुळे संघटनेला वारंवार आंदोलने करावी लागत असल्याचे महामंत्री सचिन मेंगाळे म्हणाले.
वीज कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक असून तातडीने मी स्वतः प्रशासना सोबत या सर्व विषया संबंधी संघटनेच्या शिष्टमंडळा सोबत मीटिंग आयोजित करून निश्चितच सकारात्मक तोडगा काढू, या कष्टकरी कामगारांना नाराज ठेवणार नाही असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले.
संघटनेचे च्या शिष्टमंडळात भारतीय मजदूर संघाचे क्षेत्रीय संघटन मंत्री सी व्ही राजेश,विदर्भ प्रदेश महामंत्री गजानन गटलेवार, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कोषाध्यक्ष सागर पवार,संघटनमंत्री उमेश आणेराव, उपमहामंत्री राहूल बोडके, सचिव अभिजीत माहुलकर, तात्या सावंत, जयेंद्र थुळ, संतोष कोल्हे, समीर हांडे, योगेश सायवनकर, कामगार संघाचे विठ्ठल भालेराव, दत्ता धामणकर उपस्थित होते. भारतीय मजदूर संघाचे क्षेत्रीय संघटन मंत्री सी व्ही राजेश यांच्या हस्ते उपोषणाला बसलेल्या कामगारांना शित पेय देवुन उपोषण स्थगित करण्यात आले.