उरण दि ३(विठ्ठल ममताबादे ) : काँग्रेस पक्षाचा तळागाळात प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने व गोर गरिबांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने मंगळवार दि ३ सप्टेंबर २०२४ रोजी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या शेलघर येथील निवासस्थानी काँग्रेसच्या विविध कार्यकर्त्यांवर महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी विविध कार्यकर्त्यांची विविध महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग अंतर्गत उरण शहर काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाच्या अध्यक्ष पदी काँग्रेसचे कट्टर एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ते गुफरान सईद तुंगेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग अंतर्गत रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाच्या सरचिटणीस पदी काँग्रेसचे कट्टर एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ते जितेश दत्ताराम म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, जेष्ठ नेते नंदराज मुंगाजी, पर्यावरण विभागाचे रायगड जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, पर्यावरण विभाग उरण तालुका अध्यक्ष अंगत ठाकूर आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. गुफरान तुंगेकर व जितेश म्हात्रे यांना जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या हस्ते अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. मल्लिकार्जुन खर्गे साहेब, माजी अध्यक्षा सन्माननीय श्रीमती. सोनिया गांधी, सन्माननीय श्री. राहुलजी गांधी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष समिरजी वर्तक व रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रजी घरत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या बळकटीसोबतच पर्यावरण विभागातर्फे संवर्धनाचे प्रभावीपणे काम करू. पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळात पोहोचवू. पक्षाच्या माध्यमातून गोर गरिबांना न्याय देऊ असा निश्चय यावेळी नवनियुक्त पदाधिकारी गुफरान तुंगेकर व जितेश म्हात्रे यांनी केला आहे या नियुक्ती बद्दल गुफरान तुंगेकर, जितेश म्हात्रे यांनी सर्व वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. गुफरान तुंगेकर यांची पर्यावरण विभागाच्या उरण शहर अध्यक्ष पदी तर जितेश म्हात्रे यांची पर्यावरण विभागाच्या रायगड जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.