कायदे व कायद्याची जनजागृती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

0

वडगांव निंबाळकर पोलीस ठाणे व करंजेपुल पोलीस दूरक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीराचे आयोजन.

बारामती: भारतीय न्याय संहिता २०२३ भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३,भारतीय साक्ष अधिनियम २०२३ तसेच महिला व अल्पवयीन मुलीच्या संरक्षणा संदर्भात विविध कायदे व कायद्याची जनजागृती अभियानाच्या अनुषंगाने मंगळवार दि. ०४/०२/२०२५ रोजी, शरद पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालय,सोमेश्वरनगर (करंजेपुल) येथील सेमीनार हॉल या ठिकाणी या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. विशाल विजयकुमार बर्गे आणि ॲड.सुप्रिया विशाल बर्गे हे यावेळी प्रमुख उपस्थितीत होते. अ‍ॅड,विशाल विजयकुमार बर्गे यांनी नवीन फौजदारी कायदा(BNS, BNSS, BSB) व पोलिसांचे अधिकार या बाबत माहिती दिली.  त्यांनी पुढे सांगितले की पोलिसांना या दुरुस्त कायद्यात जास्त अधिकार दिलेले आहेत. सात वर्षा पेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गंभीर गुन्ह्यातील तपास करताना घटनास्थळ चित्रिकरण करणे बंधनकारक केले आहे. तसेच पोलिसांना गांभीर गुन्ह्य़ात दोषारोपपत्र दाखल करायला १८० दिवसांपर्यंत ज्यादा कालावधी दिलेला आहे. पूर्वी ९० दिवसांत तपास पूर्ण करायला लागायचा. 

तसेच पुरावा गोळा करताना आरोपीचे हस्ताक्षर, सही, हाताचे ठसे, आवाजाचे सॅम्पल जप्त करता येणार आहेत त्याला वेगळी परवानगी कोर्टाकडून घ्यायची गरज नाही. तसेच पूर्वी मात्र आरोपींना सदर पुरावा पोलिसांना देणे बंधनकारक नव्हते. त्यामुळे ठोस पुरावा अभावी आरोपी निर्दोष मुक्त होत होते. 

आता नवीन दुरुस्ती नुसार तपास करणारे पोलीस अधिकारी यांना ९० दिवसापर्यंत आरोपीची पोलीस कोठडी मागता येणार आहे. पूर्वी केवळ चौदा दिवस मागता येत होती. तसेच इलेक्ट्रिक पुरावा म्हणजे ईमेल, मोबाईल, कॉम्प्युटर, मोबाईल एसएमएस हाही पुरावा म्हणून कोर्टात सादर करता येणार आहे.

ॲड, सुप्रिया विशाल बर्गे यांनी तरुणींना ‘पोस्को कायदा’ बद्दल मार्गदर्शन केले,मुलीना मार्गदर्शन करताना ॲड सुप्रिया बर्गे म्हणाल्या की, फसवेगिरी व भूलथापांना मुलींनी बळी पडू नये. सरकारी नोकरीत, स्पोर्ट ,आर्मी मध्ये आता मुलींना आरक्षण दिले आहे. शिक्षण सुद्धा मोफत झालेले आहे.त्यामुळे त्यांनी आपल्या पायावर उभे राहून सक्षम बनले पाहिजे. जेणे करून तुमच्या भावी आयुष्यात तुम्हाला आर्थिक अडचण येणार नाही. तुम्हाला होणाऱ्या अडचणी, लैंगिक छळ, मुलांकडून होणारा त्रास पोलिसांना,घरच्यांना किंवा आईवडील नातेवाईक यांना ठामपणे सांगता आला पाहिजे. 

जेणे करून वेळेत त्यावर कारवाई करता येईल व भविष्यातील होणारा एखादा गंभीर गुन्हा थांबवणे शक्य होईल.तरुण मुलगी ही त्या कुटुंबाची इज्जत असते. ती विवाहानंतर माहेर व सासर चा आधारस्तंभ होऊ शकते. त्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबाला कमी पणा येईल असे वागले नाही पाहिजे.तुमचे आईवडील ,नातेवाईक, गुरुजन वर्ग यांना तुमचा अभिमान वाटेल अशीच प्रगती केली पाहिजे. त्यातच तुमचे व कुटुंबांचे हित आहे असे सौ.सुप्रिया बर्गे यांनी सांगितले.

याप्रसंगी डॉ.संपतराव सुर्यवंशी, प्राचार्य सोमेश्वर सायन्स कॉलेज यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या संस्थेचे प्रो संजय देवकर  ,  वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक, सचिन काळे व पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, डॉ.राहूल शिंगटे,पोलीस नाईक रमेश नागटिळक, वारुळे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी, प्राध्यापक, कर्मचारी, हजर होते.प्रास्ताविक प्रा.सूर्यवंशी यांनी केले.तर आभार प्रा. देवकर सर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here