कारखान्यांची धुराडी बंद; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणी वाली आहे का?

0

केडगाव : निसर्गाशी झगडता झगडता नाकी नाऊ आले असताना साखर कारखाने महिनाभर उशिरा चालु होणार असल्याने शेतकरी चांगलेच हतबल झालेत. ऑक्टोबर महिना सरत आला तरी कारखान्याची अद्याप धुराडी पेटली नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी चांगलेच मेटाकुटीला आलेत.
महाराष्ट्रात उशिरा कारखाने सुरु होणार असल्याने मोठ्या प्रमाणात ऊस टोळ्यावर देखील उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात महिनाभर उशिरा कारखाने चालू होणार असल्याने परिसरातील कारखान्याकडे टोळीची यंत्रणा नक्कीच अपुरी पडणार. त्यामुळे ऊसाला तोड मिळविण्यासाठी कारखान्याकडच्या यंत्रणेकडे मनधरणी करावी लागणार?ऊसाला तोड मिळेल का नाही ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

दौंड तालुक्यातील राहु, पिंपळगाव, देलवडी, पारगाव, नानगाव, कानगाव, वाळकी अशा अनेक गावामधून नदीचे पाणी फिरल्याने या भागात ऊसाची लागण मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा आडसाली ऊसाची लागण जास्त करण्यात आली आहे. ऊसाचे पिकही जोमात आले आहे. परतीच्या पावसामुळे ऊस उत्पादकांचे कबरंडे मोडले. सततच्या पावसाने शेतात पाणी साचून राहिल्याने ऊसाला तुरे येण्यास सुरुवात झाली. परंतु यंदा कारखाने उशीरा चालू होणार असल्याने ऊस वाळू लागले आहेत.

वजनात घट होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. कारखाने सुरु न झाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी पडले. परंतु चालू हंगामात दौंड शुगर, श्रीनाथ म्हस्कोबा, अनुराज, तसेच भिमा पाटस हे तालुक्यातील चारही कारखाने केव्हा चालु होतील व ऊस तोड केंव्हा मिळेल याकडे शेतकऱ्यांच्या नजरा आहेत.

अवकाळी, महापूर या अस्मानी संकटाचा त्रास शेतकऱ्यांच्या पदरी पडला. त्यातच कारखाने उशिरा सुरू होणार? ऊसाला दर काय मिळणार? या विषयांची संभ्रमावस्था आहे. काही वाहतूक दरांनी टोळ्या आणल्या व गुऱ्हाळ घरासाठी ऊस तोडू लागले आहे. परंतु गुळाला भाव कमी झाले असा प्रश्न उपस्थित करून शेतकरी वर्गाची लूट होत आहे. कमी भावाने ऊस तोडू लागले आहेत. गहू व कांदा पिकासाठी शेतकरी कमी भावाने ऊस पीक तोडु लागले आहेत. या परिस्थितीचा विचार करता सामान्य शेतकऱ्यांना वाली कोण ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडण्यास सुरुवात झाली. ऊस उत्पादक शेतकऱ्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी यासगळ्या समोर हतबल झालेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here