काळे गटातील असंख्य कार्यकर्त्यांचा सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

0

कोपरगाव : दि.१८ नोव्हेंबर २०२२

             वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसायमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील काळे गटातील (राष्ट्रवादी कॉंग्रेस) आणि इतर पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. काळे गटातील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे काळे गटाला मोठा हादरा बसला आहे.

वन व सांस्कृतिक कार्य विभागाचे कॅबिनेट मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी (१६ नोव्हेंबर) माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या निवासस्थानी आयोजित मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी शिंगणापूर येथील काळे गटाचे कार्यकर्ते बाळासाहेब ठमाजी संवत्सरकर, अंकुश गणपत संवत्सरकर, लहू गणपत संवत्सरकर, संतोष मारुती कुऱ्हे, कैलास पुंजाराम मगर, रामनाथ भिका संवत्सरकर, सुनील रामनाथ संवत्सरकर, बापू ज्ञानदेव संवत्सरकर, सोनू अंकुश संवत्सरकर, स्वप्नील सोनवणे, मधुकर ठमाजी संवत्सरकर, विक्रम ठमाजी संवत्सरकर, संदीप लहू संवत्सरकर, सुनील प्रकाश आढाव तसेच शिवसेनेचे शिंगणापूर गटप्रमुख रवींद्र चंद्रभान शिंदे (चांदगव्हाण) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचे ना. सुधीर मुनगंटीवार, बिपीनदादा कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी पक्षात स्वागत केले.

याप्रसंगी दत्तूनाना कोल्हे, डॉ.मिलिंददादा कोल्हे, संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमितदादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविकाका बोरावके, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्तात्रय काले, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, कोपरगाव तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, शहराध्यक्ष अविनाश पाठक आदींसह भाजप, भाजयुमो तसेच संजीवनी उद्योग समूहाशी संलग्न विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी ना.सुधीर मुनगंटीवार यांनी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. त्यांनी कोल्हे कुटुंबाला तिरंगा ध्वज भेट देऊन आगामी काळातही असेच राष्ट्रप्रेरणादायी कार्य व्हावे, अशी शुभेच्छा व्यक्त केली. कोल्हे परिवाराच्या वतीने श्रीमती सिंधुताई (माई) कोल्हे, बिपीनदादा कोल्हे, डॉ. मिलिंददादा कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे, विवेकभैय्या कोल्हे, सुमितदादा कोल्हे आदींनी ना. मुनगंटीवार यांचे स्वागत केले, तर रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांनी त्यांचे औंक्षण केले. 

गायरान जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील १७ गावांतील सुमारे एक हजारावर नागरिकांना अतिक्रमणे काढण्याची नोटिस प्रशासनाने बजावली असून, यामुळे हे नागरिक बेघर होणार असल्याने सरकारने या कायदेशीर पेचप्रसंगातून तोडगा काढून अतिक्रमणधारक नागरिकांना दिलासा द्यावा. तसेच कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामे पूर्ण करावीत, अशी मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी ना. मुनगंटीवार यांच्याकडे केली. ना. मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार भारतात परत आणण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. गायरान जमिनीवरील अतिक्रमणाच्या प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधित नागरिक उघड्यावर येणार नाहीत, यासाठी पावले उचलू, अशी ग्वाही ना. मुनगंटीवार यांनी दिली. 

माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी केवळ कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी काम केले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे. पाणी, शेती, साखर उद्योग, सहकारी संस्थांच्या प्रश्नांविषयी त्यांना खूप तळमळ होती. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर कोल्हे कुटुंब हे अखंड जनसेवेचे व्रत घेऊन काम करत आहे. स्नेहलताताई कोल्हे या उत्तुंग व्यक्तिमत्त्व असणाऱ्या स्व. शंकरराव कोल्हे यांच्या सुनबाई असताना त्यांनी मंत्रालयात कधीही याचा बडेजाव न करता मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आताही आपण आमदार आहात असेच समजून जोमाने काम सुरू ठेवा. मी व सरकार तुमच्या व कोल्हे परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तुम्ही कोपरगाव मतदारसंघातील प्रश्न घेऊन नि:संकोचपणे या, मंत्रालय स्तरावर तुमचे सर्व प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करू, असे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या धाडसी नेतृत्वाखाली भारत देश झपाट्याने प्रगती करत आहे. देशभक्तीचा विचार पुढे नेत संपूर्ण देश हा आपला परिवार आहे, या भावनेतून पंतप्रधान मोदी हे देशाची सेवा करत आहेत. अध्यात्मिक व सांस्कृतिक दृष्टीने आपला देश इतर देशांच्या तुलनेत खूप समृद्ध असून, याचा अभिमान बाळगून आपण सर्वजण कार्यरत राहू. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजप बुथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व सर्व कार्यकर्त्यांनी गतिशील होऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here