के. जे. सोमैया महाविद्यालयात नवउद्योजक शिबिराचे आयोजन

0

कोपरगाव प्रतिनिधी : स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, विद्यार्थी विकास मंडळ व स्टार्टअप व इनोव्हेशन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने  नवउद्योजक शिबिराचे आयोजन करण्यात आले.  या शिबिरात कालांश उद्योग समूहाचे संचालक रोहित काले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विजय ठाणगे हे होते. 
यावेळी रोहित काले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हा असा कानमंत्र दिला.  कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातून उद्योजक होताना अनेक अडचणी आल्या, परंतु त्यावर मात करून आज राजगिरा पासून लाडू, चिक्की इत्यादी प्रोडक्टला महाराष्ट्रभर बाजारपेठ निर्माण केली. उद्योजक होण्यासाठी भांडवलापेक्षा मानसिक तयारी आणि त्यासाठी योग्य नियोजन हे अधिक महत्त्वाचे असते. बाजारपेठेचा आणि ग्राहकाचा कल लक्षात घेऊन उत्तम गुणवत्तेचे प्रॉडक्ट उद्योजक तयार करू शकला, तर त्याची स्पर्धा कोणीही करू शकत नाही. विद्यार्थ्यांनी उद्योजकता विकास व कौशल्य आत्मसात करून उद्योजक बनावे असा सल्लाही त्यांनी दिला.

प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी  आपल्या अध्यक्षीय समारोपात “नोकरी शोधणारे होऊ नका तर नोकरी देणारे बना. त्यासाठी उद्योजकीय कौशल्य व ज्ञान आत्मसात करा आणि उद्योजक बना,” असा मौलिक संदेश देताना विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी महाविद्यालय सर्वतोपरी मदत करेल. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असेही अवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव  ॲड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीप रोहमारे यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महारुद्र खोसे यांनी विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देताना नवउद्योजक शिबिर हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कौशल्यांचा विकास करण्यासाठी असून त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही केले. 

स्टार्ट अप व इनोव्हेशन सेलचे समन्वयक डॉ. शंकरय्या कोंडा यांनी अतिथींचा परिचय करून दिला व स्टार्टअप व इनोवेशन सेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय संकल्पना विकसित करून स्टार्टअप सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शन व सहकार्य केले जाते. त्या संदर्भात शासकीय आर्थिक सुविधा देखील उपलब्ध आहेत त्यांचा विद्यार्थ्यांनी  लाभ घ्यावा असे अवाहन केले. या कार्यक्रमात 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून नवोद्योजकांचे अनुभव व मार्गदर्शन प्राप्त केले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र जाधव व आभार प्रदर्शन डॉ. नामदेव ढोकळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सदाशिव नागरे डॉ. सुरेश देवरे, डॉ. गणेश शिंदे, प्रा. औताडे, डॉ. नीता शिंदे, डॉ. अभिजित नाईकवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here