‘के. बी. रोहमारे स्मृति-करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा’ संपन्न…

0

कोपरगाव प्रतिनिधी :
 “राजकारण, समाजकारण, सहकार तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात समर्पित भावनेने कार्यरत असणाऱ्या रोहमारे  परिवाराने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी गेल्या  अनेक वर्षांपासून अनेक मोठमोठे उपक्रम राबविले आहेत. ‘के. बी. रोहमारे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा’ त्यातलाच एक लक्षणीय उपक्रम आहे. वक्तृत्व कलेने समाजात चमत्कार घडत असतो. हा चमत्कार घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अभ्यास आणि प्रज्ञेच्या बळावर बोलले पाहिजे.” असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी डॉ. संतोष पवार यांनी येथे केले.  स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे  (कनिष्ठ) महाविद्यालयात आयोजित के. बी. रोहमारे स्मृतिकरंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे  अध्यक्ष अशोकराव रोहमारे होते.
                समारंभाचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांनी या राज्यस्तरीय स्पर्धेला शुभेच्छा देतांना ज्वलंत विषयांवर आधारित ही स्पर्धा समाजात प्रबोधन घडविण्याचे काम करेल असा आशावाद व्यक्त केला. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी उपस्थितांचे स्वागत करतांना या स्पर्धेतून विद्यार्थ्यांचे सर्वांगीण कौशल्य विकसित व्हावे असे  मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी महाविद्यालयाचा उंचावलेला गुणात्मक आलेखही मांडला.
      या स्पर्धेतील मानाचा के. बी. रोहमारे स्मृतिकरंडक (सांघिक प्रथम क्रमांक) रोख रुपये २१००/- व सन्मानचिन्ह न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगरच्या आकाश दत्तात्रय मोहिते व महेश जनार्दन उशीर यांनी सर्वाधिक गुण मिळवून रूपये २१००/ व सन्मान चिन्हासह  पटकावला. वैयक्तिक प्रथम क्रमांक रूपये ९०००/ अभय आळशी (वझे महाविद्यालय, मुंबई),  वैयक्तिक व्दितीय क्रमांक रूपये ७०००/ आकाश मोहिते (न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय अहिल्यानगर),  वैयक्तिक तृतीय क्रमांक रूपये ५०००/ मेघा सोनवणे (के. जे. सोमैया महाविद्यालय कोपरगाव) यांनी तर उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी रूपये १०००/ निखिल बोडखे ( न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शेवगाव), महेश उशीर (न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर) व रु. ५०१/- चे विशेष पारितोषिक वैष्णवी आंबेकर (सिन्नर महाविद्यालय)यांनी पटकावले.
या स्पर्धेसाठी ‘मानवतेचे पुजारी : उद्योगरत्न रतन टाटा’, ‘डॉ. मनमोहन सिंह : उदारीकरणाचे प्रणेते’, ‘ईव्हीएम शिवाय निवडणुका शक्य आहेत काय?, ‘विकसित भारतात शेतकऱ्यांचे भवितव्य’, ‘मराठी भाषा : अभिजात आणि लोकप्रिय’ असे ज्वलंत विषय ठेवण्यात आले होते. यासाठी मुंबई, कोल्हापूर, पुणे, संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक इत्यादि जिल्हातील विविध महाविद्यालयांतील एकूण ४२ स्पर्धक सहभागी झाले होते.
पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मा. सुरेश शिंदे व अध्यक्ष मा. संदिप रोहमारे होते. स्पर्धेचे संयोजक डॉ. जिभाऊ मोरे यांनी प्रास्ताविक व प्रमुख अतिथी तसेच परीक्षकांचा परिचय करून दिला.  सूत्रसंचालन डॉ. एस. के. बनसोडे,  प्रा. वर्षा आहेर यांनी तर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. सुधीर डागा यांनी आभार मानले. डॉ. संदीप तपासे, डॉ. बाबासाहेब भुजाडे व प्रा. जावेद शहा यांनी स्पर्धकांचे परीक्षण केले. स्पर्धेसाठी संस्थेचे विश्वस्त मा. संदीपराव रोहमारे, मा. जवाहरभाई शहा आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे सहसंयोजक डॉ. रविंद्र जाधव, स्पर्धा संयोजन समितीचे सदस्य प्रो. संतोष पगारे, प्रो. बी. बी. भोसले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे, डॉ. एन. टी. ढोकळे, डॉ. वसुदेव साळुंके, डॉ. अरगडे, प्रा. नागरे, डॉ. खोसे, डॉ. एन. जी. शिंदे, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे,  डॉ. बी. एस. गायकवाड यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेतील स्पर्धकांना ऐकण्यासाठी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here