कोपरगांव (प्रतिनिधी) सन 1975-76 सालात इयत्ता दहावीत शिकणार्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी वयाच्या 62व्या वर्षात ठरवले एकत्र येवून स्नेहमिलन करावयाचे व बघता बघता 150 विद्यार्थ्यांचा अविस्मरणीय स्नेहमेळावा कोपरगांव येथील श्री गो विद्यालयात रविवारी संपन्न झाला. या मेळाव्यात 46 वर्षानंतर भेटणार्या विद्यार्थ्यांना एकमेकांना भेटीची ओढ लागली होती ती या स्नेहमेळाव्याने पूर्ण झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्यावर दिसत होता.
फुलले रे क्षण माझे फुलले रे,मैत्रीच्या पानावर खुलले रे क्षण माझे खुलले रे. या कवितेच्या पंक्ती प्रमाणे 46 वर्षापासून जे मित्र मैत्रिणी एकमेकांना दुरावले होते ज्यांची वये आजच्या घडीला 60-62 असतांना त्यांना एकत्र करण्याची किमया साहित्यिक सुधीर कोयटे,रविंद्र क्षीरसागर,शाम बोरावके, सुषमा गिरमे राजेंद्र झंवर व त्यांच्या सहकार्यांनी करुन दाखवली व न भ्ाुतो न भविष्यती असा स्नेहमेळावा दोन दिवस घेण्यात आला. अनेक वर्षे ज्याची चातकाप्रमाणे वाट पहात होतो तो क्षण व दिवस 12 नोव्हेंबर ला दुपारी 12 वाजता आला. मनात अनिवार उत्सुकता, डोळ्यात कुतूहल व भेटण्याची ओढ, हे सारे बरोबर घेऊन शिर्डी येथील तानिया प्रेसिडेंट हॉटेल मध्ये जसजसे विद्यार्थी येत गेले त्यांना् दारातच ओळखपत्र, मैत्रीचा गोफ व अजित कोठारी, बारामतीमधील सतिश जगताप हे भेटले. आणि मन लगेचच शाळकरी पोर झाले. सारे मित्र मैत्रिणी भेटल्या. मन खूष करणारे प्रसन्न वातावरण होते. सर्व माहेरवाशीणी मैत्रिणी खूप खूष दिसत होत्या.
हाय ऽ, हॅलोच्या गजरात सारा, आसमंत दुमदुमला नि डोळे निरागसतेने चमचमले. वाढलेले वय, बदलले चेहरे चिंता, काळज्या एका मैत्रीच्या ललकारीने बदलून गेले, नि गळाभेटीचे उधाण आले…. सारे आनंदीत चेहरे बघून संयोजकही भारावून गेले. कृतकृत्य झाले. सारेच आनंदमय भारावलेल्या वातावरणात बालपणीचा हा आनंद मेळावा किती अमूल्य आहे हे नव्याने जाणवले. ओळखी अनेक असतात, होतही असतात, पण कधी त्या वेळेनुसार तत्कालीनही असतात. पण ही 46 वर्षापूर्वीची अल्लड, अबोल, बाळबोध वळणाची व निरागस वयातील मैत्री आपल्या मनाच्या कप्यात खोलवर रुजलेली होती व कांहीही निगा न राखता फूललेली होती. असे मैत्रीचे नाते विलोभनीय व रक्ताच्या नात्यापलीकडले होते. या कार्यक्रमात अनेक कर्तृत्ववान मित्र मैत्रिणी नव्याने कळल्या नि ह्या मित्र मैत्रीणींचे आपण बालपणीचे मैतर आहोत याचा अभिमान वाटला. सारेच जण एकदम उत्साही आनंदी व तरुण, टकाटक, टेंशन फ्री दिसत होते. जणू काही वर्षापूर्वीचे स्नेहसंमेलन सुरु असल्याचे भासत होते.
12 नोव्हेंबरला सुमन पाखलेने सर्व उपस्थितांचे स्वागत केले. नंतर सुषमा गिरमे ने गणेश वंदना व मंत्रपुष्पांजली ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. व त्यानंतर या देशाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून देशभक्तीपर गाणे व राष्ट्रध्वज फिरवून सर्वांनी मानवंदना दिली. त्यानंतर सुषमा गिरमे हिच्या गप्पा टप्पा या कार्यक्रमास सुरुवात झाली. खुप छान हसत खेळत, सर्वांचा सहभाग, अनेक कार्यक्रम झाले. सुषमा शिक्षिका व इतर सर्व विद्यार्थी असा वर्ग भरला होता. हजेरी घेऊन वर्ग सुरु झाला.अशा रीतीने शाळा संपली व पहीले सत्र संपले. त्यानंतर दुसरे सत्र सुप्त कलागुण सादर करून बहार आणली. हम भी कुछ कम नहीं हे दाखवून दिले. या कार्यक्रमात सुधीर कोयटे यांनी पल पल दिल के पास हे गाणे फार सुंदर गायलेे अरुणा परांजपेचे ही गायन झाले त्याचबरोबर अमीन सयानी फेम अजित कोठारी यांनी आपली दोन गाणे उत्तमपणे सादर करून त्यातील एक शर्मीली सिनेमा मधील खिलते है गुल यहा मला मनाला खूप आनंद देऊन गेले गाणी, नाट्यछटा, रविंद्र क्षीरसागर यांचे जादूचे प्रयोग व कळस म्हणजे आई रिटायर होतेय या नाटकातील सुषमा गिरमे हिने सादर केलेला उत्तम अभिनय अलका कोराळकर चे योगासने मंगल पांढरे ची उखाणे चंद्रकांत साळुंखे ची कॉमेडी नलिनी त्रिभुवन सुरेखा अग्निहोत्रीच्या मनाला भावणारे कविता..सारंच कसं सुखद, सुंदर! क्षण मन उडूउडू झालं. डान्स फ्लोअर या कार्यक्रमाला सर्वांनी प्रचंड प्रतिसाद दिला. राजकुमार झंवर याच्या संकल्पनेतून अनेक नवीन व जुने गाणे, मास्क लावून,डोक्यावर व डोळ्यावर रंगीत चष्मे ,व इतर रंगीत शिंगे लावुन नाच झाले. रात्री उशीरापर्यंत अंताक्षरी चा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात सर्वानी सहभाग घेऊन कार्यक्रमात खूप मजा आणली. दुसर्या दिवशी 13 नोव्हेंबरला रविवारी सर्वांनी कोपरगावला प्रस्थान केले. व .व श्री गो विद्यालयात ज्या वर्गात हे विद्यार्थी शिकले त्या एका वर्गात बरेच जण बसले. प्रभा पटेल हिने विद्यार्थिनीची भूमिका छान वठवली. तीला विभावरी किर्लोस्कर, मंगल पांढरे व इतरांनी खूप छान साथ दिली. रविंद्र क्षीरसागरने शिक्षकांची भूमिका करून वर्ग चालू ठेवला. वर्गात शिक्षा, छडी लागे छम छम आरडाओरडा कल्हा अशी बरीच धमाल झाली. नंतर सर्वजण प्रार्थनेसाठी बाहेर रांगेत उभे राहिले. सरला दरेकर व सुरेखा अग्निहोत्री ज्योती झंवर यांनी प्रार्थना, प्रतिज्ञा,व कवायत घेऊन शाळेच्या त्या दिवसाची आठवण करून दिली. प्रारंभी सुधीर कोयटे यांनी प्रास्तविक केले तर मुलींतर्फे विभावरी किर्लोस्कर व मुलांतर्फे रविंद्र क्षीरसागर यांनी उत्तम जुन्या आठवणी व चांगले विचार मांडले. नंतर तत्कालिन शिक्षक गुरूजनांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ए एच कुलकर्णी व नंदकिशोर परदेशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ,परदेशी यांच्याच आवाजात ए झाम्या अशी हाक देऊन हशा पिकवला. पी ए कासलीवाल सर आव्हाड सर, लूंपाटकी सर यांचेही गुरुपूजन करण्यात आले या सार्यांचे उत्कृष्ट सूत्र संचलन सुधीर कोयटे यांनी केले. शेवटी सुधीर कोयटे व दत्तात्रय वलटे यांनी पसायदान सादर केले. व अरुणा परांजपे हिने आभार प्रदर्शन केले.
चौकट
प्रभा पटेल हिने आपल्या वयाचा विचार न करता पंधरा वर्षाच्या विद्यार्थिनीच्या भूमिकेत जाऊन अतिशय सहजपणे अभिनय केला
दत्ता वलटे यांनी बुलबुल वर वाजवलेले गाणे, सुषमा गिरमे हिचे सुत्रसंचलन अत्यंत शिस्तबद्ध व रंगतदार झाले.
75-76 च्या या वर्गात प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, दिलीप दारुणकर,राजेंद्र शिंदे,सिने अभिनेता चंद्रकांत शिंदे, विभावरी किर्लोस्कर, विद्या बर्दापूरकर,नाना विसपुते यांची हजेरी स्मरणात राहिली. यावेळी तत्कालिन शिक्षकांचा मानपत्र व चांदीचे लक्ष्मीचे नाणे देऊन सन्मान करण्यात आला.