-भाजप प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांची सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी
कोपरगाव : दि. १८ नोव्हेंबर २०२२
कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या कोपरगाव शहरात अत्याधुनिक वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह उभारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्य स्तर योजनेअंतर्गत कोपरगाव नगर परिषदेला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे बुधवारी (१६ नोव्हेंबर) कोपरगाव दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी येसगाव येथील कोल्हे वस्तीवर भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी ना.मुनगंटीवार यांना एक निवेदन देऊन कोपरगाव शहरात अत्याधुनिक वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह उभारण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली. याप्रसंगी दत्तूनाना कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, डॉ. मिलिंददादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे, उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमितदादा कोल्हे, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविकाका बोरावके, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्तात्रय काले, नगर परिषदेतील भाजपचे माजी गटनेते रवींद्र पाठक, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, शहराध्यक्ष अविनाश पाठक आदी उपस्थित होते.
ना. सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनात स्नेहलताताई कोल्हे यांनी म्हटले आहे की, कोपरगाव नगर परिषद ही अहमदनगर जिल्ह्यातील एक मोठी नगर परिषद असून, कोपरगाव शहर हे वेगाने विकसित होत आहे. कोपरगाव शहरातील आणि या परिसरातील अनेक कलाकारांनी नाट्य व कलेच्या इतर प्रकारांमध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवर मोठा नावलौकिक प्राप्त केलेला आहे. नाट्य व कला क्षेत्रात येथील कलाकारांनी उत्तुंग कामगिरी बजावली आहे. कोपरगाव शहरात अत्याधुनिक वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह नसल्यामुळे स्थानिक कलावंत आणि रसिकांची मोठी हेळसांड होत आहे. कोपरगाव शहराला वैभवशाली कला व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. हा वारसा जोपासण्यासाठी आणि कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता शहरात अत्याधुनिक वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह उभारणे गरजेचे आहे.
कोपरगाव शहरात अत्याधुनिक वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह उभारण्यासाठी अंदाजे ८ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरून भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात प्रस्ताव दाखल केलेला होता.
सदर प्रस्तावास भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात प्रशासकीय मंजुरी मिळून २ कोटी रुपये निधी कोपरगाव नगर परिषदेकडे वर्ग करण्यात आला होता; परंतु सदर निधी नगर परिषद प्रशासनाने इतर कामासाठी वळवला. त्यामुळे अत्याधुनिक वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृहाच्या उभारणीचे काम रखडले. अद्यापपर्यंत नगर परिषद प्रशासनाने अत्याधुनिक वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृहाच्या बांधकामाला कुठल्याही प्रकारे चालना दिलेली नाही. बंदिस्त नाट्यगृहाअभावी स्थानिक कलावंत आणि रसिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. शहरात आधुनिक वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह उभारले गेल्यास कलाकार व रसिकांची सोय होणार असून, स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळेल. त्या दृष्टीने शहरात अत्याधुनिक वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह उभारण्यासाठी कोपरगाव नगर परिषदेस महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्य स्तर योजनेअंतर्गत आवश्यक निधी त्वरित उपलब्ध होण्यासाठी संबंधित यंत्रणेस आदेश द्यावेत, अशी मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे या निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात तातडीने कार्यवाही करून वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृहाकरिता निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या कामातील गैरव्यवहाराची चौकशी करा
दरम्यान, नगर परिषदेने कोपरगाव शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरण कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून संबंधित ठेकेदारास कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देऊन दीड वर्ष उलटले तरी अद्यापही हे काम सुरू झालेले नाही. या कामात सुरू असलेल्या गैरव्यवहाराची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करावी. तसेच खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, अशीही मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी ना. मुनगंटीवार यांच्याकडे केली. त्यावर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन ना. मुनगंटीवार यांनी दिले. स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगावातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या रखडलेल्या नूतनीकरण कामाला तसेच अत्याधुनिक वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह उभारण्याच्या कामाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतल्याने कलाकार व रसिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, स्वप्नील निखाडे, भाजपचे माजी शहराध्यक्ष कैलास खैरे, नरेंद्र डंबीर, महावीर दगडे, भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा प्रभारी विनोद राक्षे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशूर, माजी नगरसेवक जनार्दन कदम, बबलू वाणी, शिवाजी खांडेकर, बाळासाहेब आढाव, वैभव आढाव, रवींद्र रोहमारे, बापू पवार, संदीप देवकर, प्रशांत कडू, रवींद्र नरोडे, वैभव गिरमे, दिनेश कांबळे, विवेक सोनवणे, दीपक जपे, अशोक लकारे, नसीरभाई सय्यद, सद्दामभाई सय्यद, खालिकभाई कुरेशी, सोमनाथ म्हस्के, प्रसाद आढाव, अल्ताफभाई कुरेशी आदींसह भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.