राजे रामराव महाविद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा
जत दि.9(प्रतिनिधी) : संविधान हे महिला सबलीकरणासाठी महत्त्वपूर्ण असा दस्तऐवज असून त्यामुळे महिलांना आत्मसन्मान मिळाला हे लक्षात घेऊन महिलांनी प्रत्येक वळणावर स्वत:ला सिद्ध करावे. त्याकरिता दिसण्यापेक्षा असणं खूप महत्त्वाचे आहे. घटनेने ज्याप्रमाणे मतदानाचा अधिकार दिला त्याचप्रमाणे घरी कोणताही निर्णय घेताना कौटुंबिक मत मांडण्याचा अधिकार मिळावा, असे प्रतिपादन शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहाच्या अधिक्षिका सौ.सुचिता पाटील यानी केले.
त्या राजे रामराव महाविद्यालय, जत येथे महिला सबलीकरण समिती, अंतर्गत तक्रार निवारण समिती व अंतर्गत गुणवत्ता कक्ष याच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील हे होते. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रारंभी महिला सबलीकरण समितीच्या समन्वयक प्रा.मधुमती शिंदे यांनी आपल्या प्रस्ताविकात महिला दिनाची माहिती देऊन सर्व उपस्थितीताचे स्वागत केले. यावेळी मेकअप आर्टिस्ट सौ.सुनिता मालानी, उपप्राचार्य प्रा.महादेव करेन्नवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना अधिक्षका सौ.सुचिता पाटील म्हणाल्या की, आपण महिलांना त्यांचे अधिकार देतोय पण त्यांना जगण्याचा अधिकार देताय का याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. महिलांप्रती समाजात आज अनेक गुन्हे घडताना दिसत आहेत. त्या अनुषंगाने आपण सर्वांनी विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे सांगून त्या पुढे म्हणाले की, आपण चांगले दिसण्यासाठी जेवढा प्रयत्न करतो तेवढा प्रयत्न आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी करताना दिसत नाही, असेही त्या शेवटी म्हणाल्या.
यावेळी अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत नारी शक्तीचा सन्मान करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. यावेळी मुलींना स्वावलंबी होण्यासाठी आणि स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त करण्यासाठी “ब्युटी पार्लर” कोर्सचे उद्घाटन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट सौ.सुनिता मलानी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाविषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मधुमती शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.लता कारंडे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.रोहिनी शिंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, विद्यार्थी व विद्यार्थिनीनी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.