शिंदेशाहीचे नवे राज्य,राज्यकर्ते जुनेच
देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे
गेल्या 24 वर्षात अनेक वेळा देवळाली प्रवरा पोलिस स्टेशन मंजुर झाल्याची घोषणा केली जाते.परंतू या पोलिस ठाण्याच्या पायाभरणीचा शुभारंभ सुद्धा होवू शकला नाही.शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर राहुरी फँक्टरी येथिल शिंदे गटाचा (बाळासाहेबांची शिवसेना) मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात खा.सदाशिव लोखंडे यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले देवळाली प्रवरा पोलीस स्टेशनचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मार्गी लावणार असल्याचे गाजर दाखवून कार्यकर्त्यांना पुन्हा कामाला लावले आहे.या गाजरा मागे संघटना मजबुतीकरणाचे धोरण लपलेले माञ जाहिर केले जात नाही.देवळाली प्रवरा येथिल पोलिस स्टेशनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्कालीन गृहमंञी तथा पालकमंञी प्रा.राम शिंदे, तत्कालीन गृहराज्यमंञी दिपक केसरकर यांनी तर माँडेल पोलिस स्टेशनची घोषणा केली होती.हि घोषणा आचारसंहितेत अडकली होती. गेल्या दोन एक वर्षापूर्वी आ.लहू कानडे यांनी हा प्रश्न पुढे आणला. खा.सदाशिव लोखंडे यांनी पुन्हा पोलिस स्टेशनचे गाजर दाखवून प्रश्न ऐरणीवर आणला असला तरी खरंच पोलिस स्टेशन होईल का? की पुन्हा लालफितीच्या कारभारात अडकवून सर्वसामान्य नागरीकांना गाजर दाखवण्याचे काम होणार आहे.
देवळाली प्रवरासह 32 गावाँकरीता स्वतंत्र माँडेल पोलीस ठाण्यास तत्कालीन गृहमंञी यांनी मंजुरी देवून घोषणा केली. परंतू नविन पोलीस ठाणे लालफीतीच्या कारभरात अडकले गेले सध्या देवळाली प्रवरासह 17 गावासाठी असणाऱ्या पोलीस दुरक्षेञात (पोलीस चौकी) अवघे चार पोलीस कर्मचारी नियुक्तीला आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना कायमच इतरञ नेमणूक केली जाते त्यामुळे चौकीचा कारभार बंद अवस्थेत पाहण्यास मिळते.येथिल पोलीस कर्मचारी कायमच ताणतणात असल्याचे तक्रारदारांना स्पष्टपणे जाणवत आहे. त्याचा ञास तक्रारदार नागरीकांना फिर्याद दाखल करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळाली प्रवरासह 32 गावांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे देवळाली प्रवरात करण्यासाठी प्रस्ताव 1998-99 साली मा.आ.चंद्रशेखर पा. कदम यांनी दाखल केला होता. नगरपालिका कार्यालयाशेजारी पोलीस ठाण्यासाठी भव्य जागा महाराष्ट्र पोलीसांच्या नावावर आहे. या जागेची तत्कालीन अधिका-यांनी वेळोवेळी पाहणी केली आहे. 20 नोव्हेंबर 2014 रोजी तत्कालीन पोलीस अधिक्षक रावसाहेब शिंदे यांच्यासह श्रीरामपुर विभागाचे तत्कालीन पोलीस उपअधिक्षक अंबादास गांगुर्डे, तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक रजपुत यांनी पाहणी करुन 15 दिवसाच्या आत भुमीपूजन करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यावेळीही पोलीस ठाण्याचे भुमीपूजन झाले नाही.
मा.आ.कदम यांनी सातत्याने पोलीस ठाण्याचा प्रस्तावाचा पाठपुरावा करुन तो मंजुरीसाठी घेण्यात यावा यासाठी वेळोवेळी गृहमंत्री, गृहराज्यमंत्री, गृहसचिव यांच्या भेटी घेतल्या. 2004 ते 2009 या कालावधीमध्ये विधानसभा सदस्य असतांना मा.आ.चंद्रशेखर पा.कदम यांनी विधानसभेत देवळाली प्रवरा पोलीस ठाणे होण्यासाठी प्रश्न उपस्थित केलेला होता. त्यावेळी लवकरच पोलीस ठाणे करण्याचे आश्वासन मिळाले होते. परंतु राजकीय डावपेच यामुळे पोलीस ठाण्याची मंजुरी लांबणीवर पडली होती.2014 ते 2019 या कालावधीत शिवसेना शहर प्रमुख सुनिल कराळे यांनी विविध प्रकारची आंदोलने छेडली परंतू सत्ताधाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही.शेवटी मुख्यमंत्री यांच्या निवासस्थाना समोर आत्मदहन करण्याचा इशारा देताच तत्कालीन गृहराज्यमंञी ना.दिपक केसरकर यांनी देवळाली प्रवरा स्वतंञ माँडेल पोलीस ठाण्यास परवानगी देवून सहा महिण्याच्या आत पोलीस ठाणे सुरु करण्याचे आश्वासन दिले. परंतू लोकसभा व विधानसभा आचार संहितेमुळे स्वतंञ पोलीस स्टेशन लालफितीच्या कारभारात अडकले
तालुक्याचे ठिकाण असलेले राहुरी शहर, देवळालीप्रवरा, वांबोरी, बारागावनांदुर, मांजरी,सोनगाव सात्रळ, म्हैसगाव, ताहाराबाद सह 96 गावे असलेला राहुरी तालुका दोन नगरपरिषदा,दोन साखर कारखाने,दहा जिल्ह्याचे कार्यक्षेत्र आसलेले राज्यातील पहीले कृषी विद्यापीठ,रेल्वे स्टेशन,शिर्डी शनिशिंगणापूर या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तिर्थस्थळांना जोडणारे राज्य महामार्ग क्रमांक 10 वरिल जिल्ह्यातील मध्यवर्ती तालुका तसेच भौगोलिक क्षेत्रफळानेही विस्तारलेला पश्चिमेकडील दुर्गम भाग असलेला राहुरी तालुक्यात पोलीस ठाणे मात्र एकच 96 गावांचा गृहखात्याचा भार सांभाळण्याची जबाबदारी अवघ्या 78 पोलीसांवर आहे. राहुरी तालुक्याला प्रमुख पोलीस ठाणे आहे राहुरी शहरात या पोलीस ठाण्यात पोलीस बळ 78 आहे.यात एक पोलीस निरिक्षक,एक तीन उपनिरिक्षक, दहा सहा.फौजदार, पो.ना.सत्तेचाळीस,राहुरी पोलिस ठाण्याअंतर्गत एकूण आठ बीट आहेत तर दोन औट पोस्ट अशी एकूण पोलीस बळसंख्या व कार्यक्षेत्र राहुरी पोलीस ठाण्याचे आहे.
राहुरीच्या 96 गावांचे अंतर पाहता मांजरी हे पूर्वेकडील शेवटचे गाव 24 कि.मी.अंतरावर नेवासा तालुक्याच्या हद्दीला लागून आहे,पश्चिमेकडील दुर्गम भागातील म्हैसगाव कोळेवाडी याचे अंतर साधारण 26 कि.मी.संगमनेर तालुक्याच्या हद्दीला लागून आहे,दक्षिणेकडे असलेले वांबोरी शहरापासून पुढे असलेले कात्रड गुंजाळे गाव 28 कि,मी.अंतरावर नेवासे व नगर तालुक्याच्या सिमेला लागून आहे तर उत्तरेकडील सोनगाव सात्रळ हे प्रवरा परिसरात राहाता तालुक्याच्या हद्दीला 22 कि.मी.अंतरावर आहे तालुक्याच्या सिमा या साधारणतः 22 ते 28 कि.मी.अंतरावर येतात यात दुर्गम भाग व भौगोलिक स्थिती व गुन्हेगारीचा आलेख पाहता राहुरीत गुन्ह्यांची संख्या ही सर्वाधिक आहे,यात दाखल असलेल्या सर्व प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. राहुरीत गुन्हे दाखल होण्याची आकडेवारी जिल्ह्यातील इतर सर्व पोलीस ठाण्यांपेक्षा राहुरीत सर्वाधिक आहे तेव्हा आकाराने व गुन्हेगारी संख्येत मोठ्या असलेल्या राहुरी तालुक्याच्या गृहखात्याचा कारभार सांभाळणाऱ्या पोलीस दलाची संख्या ही अपूरीच आहे 78 पोलीस हे 96 गावाचा पोलीसी कारभार सांभाळताना तणावपूर्ण जीवन जगताना आढळून येतात राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहराला स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर झालेले आहे याचा प्रस्ताव शासनाने मंजूर करुन देखील येथे पोलीस ठाण्याची स्वतंत्र इमारत उभी राहण्यास कोठे आडकाठी आली आहे हे आजवर अनुत्तरीत आहे येथे पोलीस ठाण्याचे बांधकाम करण्यास प्रशासनाला मुहुर्त सापडत नसल्याने इमारत प्रलंबित आहे याठिकाणी जर इमारत उभी राहून पोलीस ठाणे निर्माण झाले तर राहुरीवरील गुन्ह्यांचा त्रास व तपास कमी होवून काही प्रमाणात गुन्हेगारीस आळा बसू शकतो तसेच वांबोरी शहरालाही पोलीस ठाण्याची इमारत बांधून तेथे पोलीससंख्याबळ वाढवून दिले तर त्या भागातील गुन्हेगारीला आळा बसून गुन्ह्यांचा तपास होवू शकतो याबाबींकडे लोकप्रतिनीधी व गृहखात्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
सन 2016 मध्ये चार दिवसानंतर संपणा-या आर्थिक वर्षा नंतर देवळाली प्रवरा स्वतंञ पोलिस ठाण्यासाठी भरीव निधी देवून मुख्यमंञ्यासह मी पोलिस ठाण्याचे भुमिपुजन करण्यासाठी लवकरच येईल.असे तत्कालीन गृहराज्य मंञी तथा पालकमंञी प्रा.राम शिंदे यांनी दिले होते.त्या गोष्टीस सहा वर्ष पुर्ण झालेत.
27 मार्च 2016 मध्ये राहुरी कारखाना देवळाली प्रवरा येथे शिवबा प्रतिष्ठाण व सत्यजित पा.कदम मिञ मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त रुग्णवाहीनीका व पाण्याचा टँकर पालक मंञी ना.प्रा,शिंदे यांच्या हस्ते लोकापर्णन करण्यात आले होते.त्या वेळी ना.शिंदे यांनी जाहिर सभेतुन देवळाली प्रवराच्या कार्यकर्त्यांना आश्वासित केले होते.
सन 2021 मध्ये देवळाली प्रवरा शहरात एकाच राञी 9 ते 10 ठिकाणी दरोडे पडल्या नंतर आ.लहू कानडे अप्पर पोलिस अधिक्षक यांच्यासह स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांची कानउघडणी करुन स्थानिक पोलिसांच्या बदल्या केल्या होत्या.अधिवेशनात स्वतंञ पोलिस स्टेशनचा प्रश्न ऐरणीवर आणला होता.महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्याने राजकीय नेत्याकडून गाजर दाखविण्याचे काम झाले.
शिंदे सरकार सत्तेत आल्या नंतर खा.लोखंडे यांनी शिंदे गटात प्रवेश करुन मतदार संघातील गावातुन शिंदे गटाचे सभासद वाढविण्यासाठी मेळावे घेण्यास सुरवात केली जिल्ह्यातील अनेक गावात खा.लोखंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी होवून काळे झेंडे दाखविले.परंतू राहुरी तालुक्यातील राहुरी फँक्टरी येथे शिंदे गटाचा मेळावा घेवून तालुका व स्थानिक कार्यकारणीची निवड करण्यात आली. तालुकाध्यक्ष सुनिल कराळे यांची निवड करुन स्वंतञ पोलिस ठाण्यासाठी कराळे यांनी आंदोलने केली आहे.लवकरच मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन देवळाली प्रवरात पोलीस स्टेशनचा व्हावे अशी मागणी करणार आहे.असे खा.लोखंडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. मिळालेले आश्वासन खरंच पुर्ण होणार की, पुन्हा गाजर दाखविणार.
राहुरी फॅक्टरी, श्रीरामपूर रोड येथील श्री.दत्त लॉन्स येथे बाळासाहेबांची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा खा.लोखंडे यांच्या हस्ते पार पडला प्रसंगी ते बोलत होते.यावेळी शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, उपजिल्हाप्रमुख आण्णासाहेब म्हसे, राहुरी तालुका प्रमुख सुनील कराळे,श्रीरामपूर तालुका प्रमुख बापू शेरकर,शाम गोसावी, राजेंद्र लांडगे,संपत महाराज जाधव,जयेश वाकचौरे आदी उपस्थित होते.
चौकट
शिंदे सरकार देवळालीकरांचे स्वप्न पुर्ण करणार का?
1998-99 साला पासुन देवळाली प्रवरात स्वतंञ पोलिस स्टेशन होण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.माजी आ.चंद्रशेखर कदम हे भाजपाच्या पक्षातून राहुरीचे आमदार झाले होते.त्यावेळी आ.कदम यांनी पोलिस स्टेशनचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करुन गृहमंत्री, गृहराज्यमंत्री, गृहसचिव यांच्या भेटी घेतल्या.परंतू यश आले नाही. आज हि स्वतंञ पोलिस स्टेशन करीता पञव्यवहार सुरुच आहे.2014 पासुन शिवसेना शहर प्रमुख सुनिल कराळे यांनी विविध प्रकारची आंदोलने छेडली परंतू सत्ताधाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. वास्तविक पाहता भाजपाचे देवेंद्र फडणवीस हे गृहमंञी असल्याने हा प्रश्न सुटणे अपेक्षित होते. माञ तसे काही चिन्ह दिसत नाही.महाविकास आघाडी सरकार जावून शिंदे भाजप सरकार सत्तेत आले आहे.शिंदे सरकार मध्ये तत्कालीन गृहमंञी प्रा.राम शिंदे, दिपक केसरकर उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस हे सर्व सरकार मध्ये आहे. खा.सदाशिव लोखंडे यांच्या मागणीला हिरवा कंदिल मिळो नव्हे पोलिस स्टेशनचे भुमिपुजनाचा कार्यक्रमच व्हावा अशीच अपेक्षा देवळालीकरांची आहे.