गणपतीपुळेच्या समुद्रात पंढरपुरातील ४ तरुण बुडाले

0

सातारा : कोकणातील गणपतीपुळे परिसरात पर्यटनासाठी आलेले चार तरुण बुडाले. या दुर्घटनेत एकाला आपला जीव गमवावा लागला. अन्य तिघांना वाचवण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं. ही दुर्देवी घटना रविवारी (ता.२ जून) दुपारच्या सुमारास घडली. अजित धनाजी वाडेकर, असं बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. हे सर्व तरुण पंढपूर येथील रहिवासी असल्याचं कळतंय.
अजय बबन शिंदे ,आकाश प्रकाश पाटील आणि समर्थ दत्तात्रय माने, अशी वाचण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे चौघे मित्र पंढरपूर येथून गणपती पुळे येथे पर्यटनासाठी आले होते. गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर रविवारी दुपारच्या सुमारास ते समुद्रातील पाण्यात पोहण्यासाठी उतरले.

मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने यातील अजित हा पाण्यात बुडून गटांगळ्या खाऊ लागला. त्याला बुडताना पाहून इतर मित्रही खोल पाण्यात उतरले. त्यांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही बुडू लागले. चार तरुणांना बुडताना पाहून इतर पर्यटकांनी आरडाओरड सुरू केली.
तेव्हा समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी तत्काळ पाण्यात उड्या घेतल्या. अथक प्रयत्नानंतर चारही तरुणांना पाण्याबाहेर काढण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं. मात्र, यातील अजितच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. इतर तिघांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here