गुजरातमध्ये नदीवरचा झुलता पूल कोसळून अनेकजण नदीत पडले ; जीवितहानीची अद्याप माहिती नाही !

0

मोरबी : गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात पूल कोसळण्याची घटना घडली आहे. या अपघातात पुलावर उपस्थित असलेले अनेकजण नदीत पडल्याची माहिती समोर आली आहे.
मोरबी येथील माचू नदीवरील शंभर वर्षे जुना पूल रविवारी (30 ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास कोसळला. यावेळी पुलावर उपस्थित असलेले पर्यटक नदीत कोसळले.
नदीत पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

मोरबी शहरातून जाणाऱ्या माचू नदीवरील हा पूल वर्षानुवर्षे बंद होता. दिवाळीनंतर गुजराती नववर्षाला हा पूल खुला करण्यात आला होता. दिवाळीनंतरच्या सुट्ट्या आणि रविवार असल्याने आज या पुलावर प्रचंड गर्दी जमली होती. पण पूल नेमका कशामुळे कोसळला, याची नेमकी माहिती अद्याप मिळालेली नाही. या दुर्घटनेत नेमकी जीवितहानी किती झाली, याचीही माहिती अद्याप मिळू शकली नाही.

सदर पूल हा मोरबीतील आकर्षणाचं केंद्र मानला जातो. मोरबी शहर प्रशासनाच्या वेबसाईटनुसार, हा झुलता पुल शंभर वर्षांपूर्वी बांधलेला अभियांत्रिकीचा उत्तम नमुना होता. पण काही कारणामुळे तो अनेक वर्षे बंद होता.

हा झुलता पूल 1.25 मीटर रुंद असून त्याची लांबी 233 मीटर इतकी आहे. मोरबी येथील दरबारगड पॅलेस आणि लखधीरजी अभियांत्रिकी महाविद्यालय या दोन ठिकाणांना जोडण्याचं काम पुलामार्फत केलं जातं.

नुकतेच मोरबीला एक वेगळी ओळख देण्यासाठी युरोपमध्ये उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा स्विंगिंग पूल तयार करण्यात आला होता. पण काही दिवसांतच हा पूल कोसळल्याने खळबळ माजली आहे.

या दुर्घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली.

भूपेंद्र पटेल म्हणाले, “मोरबीतील पूल दुर्घटनेमुळे मला अतीव दुःख झालं आहे. जिल्हा प्रशासनाकडून येथील बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. जखमींवर आवश्यक ते उपचार तत्काळ करण्यात यावेत, अशी सूचना प्रशासनाला करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाशी मी संपर्कात आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here