सिलेंडर स्फोट होता होता वाचला. कोणतीही जीवितहानी नाही.
उरण दि २३(विठ्ठल ममताबादे ) : सोमवार दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास उरण शहरातील राजपाल नाका येथे गॅस सिलेंडरचे दुरुस्तीचे बेकायदेशीर दुकान आहे. या बेकायदेशीर व कोणतेही शासकीय परवानगी नसलेल्या दुकानात गॅस गळती असलेल्या सिलेंडरची दुरुस्ती करत असताना अचानकपणे सिलेंडरने पेट घेतला. अचानक सिलेंडरला आग लागल्याने दुकान चालकाने ते सिलेंडर राजपाल नाक्यावर(खिडकोळी नाक्यावर )भर रस्त्यावर टाकून दिले. आगीचा मोठा भडका उडाला होता. रस्त्यावर अचानक पणे आग लागलेली सिलेंडर टाकल्याने या ठिकाणी प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. राजपाल नाका हे बाझारपेठेत असल्याने ते गर्दीचे, वर्दळीचे ठिकाण आहे. मात्र आग विझविल्याने,प्रसंगावधानते मुळे अनेकांचे प्राण वाचले आहे.दुकान चालकने प्रसंगावधान साधत आग लागलेल्या सिलेंडर वर गोणी टाकून त्यावर पाणी टाकले व आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने यावेळी कोणतेही जीवितहानी झाली नाही. सदर घडलेल्या घटने मुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. उरण मधील अनेक दुकानाचे अजूनही फायर ऑडिट अजूनही का झाले नाहीत. बेकायदेशीरपणे, अनधिकृत पणे सिलेंडरचे दुरुस्तीचे व सिलेंडरच्या सामानाचे विक्री करण्यासाठी लागणारे परवानगी नसताना दुकान चालवीणारे कोणत्या बेसवर दुकान चालवीतात. त्यांना कोणाचे वरदहस्त आहे ? उरण शहरात राजपाल नाका, कोटनाका, बाझार पेठेत बेकायदेशीर सिलेंडर दुरुस्तीची व सिलेंडरच्या वेगवेगळ्या पार्टची विक्री करणाऱ्या दुकान दारांना कोणतेही परवानगी नाही.
या दुकान दारावर पोलीस प्रशासन व अग्निशमन यंत्रणा, उरण नगर परिषदेतर्फे कारवाई का केली जात नाही असा सवाल उपस्थित होत आहे.जर एखाद्या स्थानिक व्यक्तीने वडापाव किंवा इतर खाद्य पदार्थचे दुकान टाकून तिथे व्यवसाय करताना व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरण्याच्या ऐवजी घरगुती गॅस सिलेंडर वापरला तर त्यांच्यावर लगेच कारवाई केली जाते. मात्र मग उरण शहरात अशा बेकायदेशीर व अनधिकृत पणे चालणाऱ्या दुकानावर, चालकावर का कारवाई केली जात नाही असा सवाल प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते नरेश भोईर यांनी उपस्थित केला आहे.नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या व बेकायदेशीरपणे सिलेंडरचे दुकान चालवीणाऱ्या दुकान चालकावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रसिद्ध कार्यकर्ते नरेश भोईर यांच्यासह, व्यापारी वर्गांनी, प्रवाशी जनतेने केली आहे.
सिलेंडरला आग लागल्याने उरण शहरातील सुरक्षाचे तीन तेरा वाजले असल्याचे दिसून येते. उरणच्या नागरिकांची सुरक्षा आता राम भरोसे आहे. मात्र एवढी मोठी घटना घडून सुद्धा दुकान चालकावर कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यात आले नसल्याने उरण शहरातील व्यापारी वर्गानी, प्रवाशी वर्गांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सिलेंडर दुकान चालकाची फक्त चौकशी करून त्याला सोडण्यात आल्याने प्रवाशी व व्यापाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.या बाबतीत दुकान चालक अरविंद योगी यांना विचारले असता आम्ही उरण मध्ये अनेक वर्षे हे काम करत आहोत. सकाळी जुना छोटा बाटला ग्राहकाच्या हातून निसटला व त्यामुळे आग जास्त भडकली. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती पाऊले आम्ही उचलली आहेत. सिलेंडरला आग लागल्यावर आम्ही पळून न जाता लागलेली आग आम्ही स्वतः विझविली. यापुढे अशी घटना घडणार नाही याची आम्ही योग्य ती काळजी घेऊ असे दुकान चालक अरविंद योगी यांनी सांगितले.
राजपाल नाका येथे सिलेंडरला आग लागल्याचे समजताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले. पोलीस ज्यावेळी घटना स्थळी गेले त्यावेळी आग विझलेली होती.सिलेंडरला लागलेली आग किरकोळ स्वरूपाची होती.त्यामुळे घडलेल्या घटनेची डायरीत नोंद करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दुकान चालकांना योग्य त्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. जीवितहानी होऊ नये. यासाठी पोलीस प्रशासनातर्फे पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे.सदर घडलेल्या घटने बाबत कोणत्याही व्यक्तीने उरण पोलीस स्टेशन मध्ये येऊन तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे सदर दुकान चालकावर कोणताही गुन्हा दाखल केला नाही.
– जितेंद्र मिसाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण पोलीस ठाणे, उरण