कोपरगाव : गोदावरी डावा व उजवा कालव्यास उन्हाळा हंगाम 2023-24 करता पाटबंधारे विभागाने आवर्तन सुरु केले होते मात्र पिण्याचे पाणी भरणे झाल्या नंतर विभागाने सिंचनाकरिता पाणी न देता आवर्तन बंद केले आहे. यामुळे लाभक्षेत्रातील चारापिके ,फळबाग आणि ऊस शेती पूर्णतः धोक्यात आली आहे. त्यामुळे बंद केलेले आवर्तन पुन्हा सुरू करावे अशी विनंती कोपरगाव तालुका शेतकरी कृषी समितीने नाशिक पाटबंधारे विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आपल्या निवेदनात समितीने पुढे म्हटले आहे की यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रासह गोदावरी कालव्यावरील लाभ क्षेत्रामध्ये अतिशय कमी पाऊस असल्याकारणाने गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील विहिरीनीतळ गाठला असून काही गावांमध्ये विहिरी अक्षरशा कोरड्या पडलेल्या आहेत. परिणामी लाभक्षेत्रातील सर्व गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील बिकट होत चाललेला असून त्याकरिता पाटपाण्याच्या आवर्तनाची लाभक्षेत्रामध्ये अत्यंत आवश्यकता आहे.
कालवा सल्लागार समितीच्या अहमदनगर येथील बैठकीत उन्हाळा आवर्तना करिता 15 मे 2024 ही तारीख निश्चित करण्यात आलेली होती परंतु त्या बैठकीमध्ये कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने विनंती करण्यात आली होती की 15 मे 2024 ही तारीख उभ्या बारमाही पिकांकरिता खूप उशिरानी होईल त्यावेळी विभागाने देखील धरणांतील पाण्याची परिस्थितीचा तसेच लाभ क्षेत्रातील पिकांचा आढावा घेऊन उन्हाळ हंगामातील आवर्तनाचे नियोजन करू असे सांगितले होते .
माननीय पाटबंधारे विभाग नाशिक यांनी दिनांक 30/4/2023 रोजी जाहीर प्रगटन काढून नमुना न. 7 प्रमाणे पाणी मागणी नोंदवण्याचे आवाहन केले होते त्या अनुषंगाने गोदावरी काव्यावरील लाभधारक शेतकऱ्यांनी आपली बारमाही पिकांसाठी पाणी मागणी आपणाकडून नोंदवलेली आहे.
दिनांक 12 मे 2024 रोजी गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यास पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले त्याप्रमाणे प्रथमता पिण्याचे पाणी प्राधान्यक्रमाने भरून देण्यात आले व दिनांक 22 मे 2024 पासून शेतीसाठी सिंचनाचे पाणी सोडण्यात आले होते परंतु अचानक दिनांक 23 मे 2024 रोजी कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजी नगर यांनी कार्यालयीन आदेश क्रमांक ९२५ अनुषंगाने गोदावरी डाव्या उजव्या काव्यावरील सिंचनाचे पाणी बंद करून नांदूर मधमेश्वर धरण समूहातील 22.67 दशलक्ष घनमीटर पाणी नांदूर मधमेश्वर जलद कालव्यात सोडण्याचे आदेश दिले आहेत.
पाणी हे सिंचनाला दिल्यामुळे कोपरगाव गोदावरी डाव्या कालव्या उजव्या कालव्यावरील लाभ क्षेत्रातील पिकांचा प्रश्न सुटेलच परंतु पिण्याचा पाण्याचा तसेच जनावरांचा चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटण्यास मदत होईल कारण लाभ क्षेत्रातील सर्वच विहिरींनी आता तळ गाठलेला असून काही ठिकाणी विहिरी संपूर्ण कोरड्या पडलेल्या आहेत अशावेळी तालुक्यातील लाभ क्षेत्रातील सर्व वाड्या वस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला असून बहुतांश ठिकाणी आता टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली आहे गोदावरी कालव्यावरील फळबाग, ऊस या उभ्या बारमाही पिकांना पाणी द्यावे त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी जी छोटी बंधारे तसेच गावतळी देखील भरून द्यावी अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.