गोदावरी खोरे दूध संघाकडून दिवाळीनिमित्त बारा कोटी रक्कम बँकेत वर्ग- परजणे

0

कोपरगांव (वार्ताहर)

गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघातर्फे दिवाळीच्या सणानिमित्त दूधाचे पेमेंट, दूध उत्पादकांच्या परतीच्या ठेवी, वाहतूकीचे पेमेंट, संघ कर्मचा-यांना पगार व बोनस अशी सुमारे १२ कोटी २ लाख ५१ हजार इतकी रक्कम वाटप करण्याचा निर्णय घेतला असून ही रक्कम बँकेत वर्ग केली असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी दिली.

गोदावरी दूध संघाच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना दूध व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडण्यासाठी संघाने अमेरिकेतून आयात केलेल्या अत्याधुनिक सॉर्टेड सिमेनची ऑक्टोंबर २०१६ पासून कार्यक्षेत्रात सुरुवात केली. या सॉर्टेड सिमेनमुळे जन्माला येणाऱ्या कालवडींची संख्या ९१ टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. जन्मलेल्या कालवडींपैकी अनेक कालवडी व्यायल्या असून त्यांची दूध देण्याची दैनंदिन क्षमता सुमारे २६ ते २७ लिटर्स इतकी आहे. कोपरगांव तालुक्यासह राहाता, वैजापूर, येवला, सिन्नर या तालुक्यातही दूध उत्पादन वाढीसाठी ४० केंद्रांमार्फत कृत्रिम गर्भधारणा कार्यक्रम राबविला जात आहे. त्याकरिता संघ वर्षाकाठी सव्वा कोटीपर्यंत खर्च करीत आहे. संघाच्या कार्यस्थळावरील पशुरोग निदान प्रयोगशाळेत सन २०१८ पासून जनावरांच्या विविध आजारांवर निदान व उपचार सुरु आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया व प्रवरा सहकारी बँकेच्या आर्थिक सहकार्याने दूध उत्पादकांना गायी खरेदी, गोठा दुरुस्ती, कडबाकुट्टी, मिल्कींग मशिन असे साहित्य खरेदी करण्यासाठी कमी व्याजाने कर्ज उपलब्ध करुन दिलेले आहे. तसेच नव्याने स्टेट बँकेच्या कोपरगांव शाखेकडून संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांना गायी खरेदीसाठी अत्यल्प व्याजाने कर्ज पुरवठा केलेला संघाने नाशिक येथील जीएचई – ईव्ही लिमिटेड या शेतीपुरक व्यवसायाशी निगडीत असलेल्या कंपनीबरोबर वीस वर्षाचा करार करुन दूध उत्पादकांच्या शेतातील शेतमाल तयार झाल्यानंतर वाया जाणारा पालापाचोळा, भुसा, ऊसाचे पाचट, मक्याचा चारा यापासून बायोमास पॅलेटची निर्मिती करण्यात येणार आहे. या उद्योगातून कार्यक्षेत्रातील अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील बहुतांशी जनतेचे जीवनमान दूध व्यवसायावर अवलंबून असल्याने या व्यवसायाच्या वाढीसाठी संघाने अनेक योजना हाती घेतल्या आहेत.

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीने शेती पिकांची मोठी हानी झालेली आहे. शेतकरी संकटात सापडलेले आहेत. परतीचा पाऊस अजूनही सुरुच असल्याने उरलीसुरली पिके संपूर्णपणे नष्ट झाली आहेत. या अडचणीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना यंदाच्या दिवाळीसाठी संघाने सुमारे बारा कोटींहून अधिक रक्कम  वाटप करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे दूध उत्पादक तसेच कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी देखील नैसर्गिक संकटाचा विचार करुन काटकसरीचे धोरण  स्वीकारण्याची गरज असल्याचेही आवाहन श्री परजणे पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here