सांगली : आरग (ता. मिरज) येथे सुनील पोपट कोळी (वय २५) व निकिता मिलिंद कांबळे (२३, दोघे रा. बिचुद ता. वाळवा) या दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघात झालेल्या वादातून त्यांनी गळफास घेतल्याची माहिती मिळाली. या घटनेने आरग गावात खळबळ उडाली.
प्रेमविवाह करून सुनील व निकिता हे दाम्पत्य आरग येथे आठ दिवसांपूर्वी वास्तव्यास आले होते. गावातील गणपती मंदिराजवळील नाईक वस्तीवर प्रशांत बामणे यांच्या खोलीत दोघेही भाड्याने राहत होते. सुनील कोळी हा वाहन चालक म्हणून काम करीत होता. निकिता ही मोराळे ता. पलूस येथील आहे. काल, गुरुवारी रात्री दोघांनीही खोलीतील अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
दोघात वाद झाल्याने सुनील कोळी हा गुरुवारी सायंकाळी बाहेर गेल्यानंतर निकिता हिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरी आल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सुनील यानेही गळफास घेत आत्महत्या केल्याचा संशय आहे. याबाबत माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोघांचे मृतदेह शवविछेदनासाठी मिरज सिविलमध्ये पाठविण्यात आले. घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती.
आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलण्याएवढा दोघात वाद झाला की अन्य कोणत्या कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली याची पोलीस चौकशी करीत आहेत. प्रेमविवाह करून दोघेही आरग गावात येऊन राहिले होते. निकिता ही सुनीलची दुसरी पत्नी असल्याचीही चर्चा होती. याबाबत ग्रामीण पोलिसात नोंद आहे. मिरज उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.